शाळांकडून पालकांवर बळजबरी, आला हा प्रकार उघडकीस...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

सरकारच्या या पत्राला न जुमानता काही शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्याचे संदेश पाठविण्यास सुरू केले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नागपूर : राज्यात कोरोनाचे संकट तीव्र होत असताना, कोणत्याही शाळेने पालकांकडून शुल्क मागू नये वा कुठल्याही प्रकारचा दबाव आणू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत. मात्र, असे असताना, वर्धा मार्गावरील एका नामांकित शाळेकडून पालकांना पुस्तक खरेदी करण्याची सक्ती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवीत, शाळेकडून एकाच वेळी तीन वर्गाच्या पालकांना बोलाविण्यात येत आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. याशिवाय शालेय शिक्षण विभागाने पत्र काढून शाळांनी कुठल्याही पालकाकडून शैक्षणिक शुल्क व इतर शुल्क घेऊ नये असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. या निर्देशाविरोधात जाणाऱ्या शाळा व शैक्षणिक संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे.

कॅन्सरग्रस्त चिमुकलीवर शस्त्रक्रियेसाठी पाच लाखांचा खर्च; बाप झाला हतबल...मदतीचे आवाहन

मात्र, सरकारच्या या पत्राला न जुमानता काही शैक्षणिक संस्थांनी शुल्क भरण्याचे संदेश पाठविण्यास सुरू केले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. असे असताना, आता काही सीबीएसई शाळांकडून पुस्तक आणि स्टेशनरी खरेदी करण्यासाठी पालकांना संदेश पाठविल्या जात आहे. याशिवाय दिलेल्या वेळेत 1 ते 9 वी पर्यंतचे पुस्तक घेऊन जाण्यास सांगत आहेत.

यामध्ये प्रामुख्याने वर्धा मार्गावर असलेल्या एका नामवंत सीबीएसई शाळेकडून अशा प्रकारचे संदेश पालकांना पाठविण्यात येत आहेत. त्यानुसार या शाळेमध्ये पुस्तके खरेदी करण्यासाठी दररोज गर्दी उसळत आहे. विशेष म्हणजे खरेदीमध्ये अव्वाच्या सव्वा किमती लावण्यात येत असल्याने पालकांना आर्थिक भूर्दंड बसतो आहे.

 

येथे करा तक्रार

 

शाळांकडून शैक्षणिक शुल्कांची मागणी करण्याच्या तगादा शाळांकडून करण्यात येत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाला सोशल मिडियाच्या माध्यमातून येत आहेत. त्यामुळे यावर कारवाई करण्याच्या अनुषंगाने उपसंचालक कार्यालयाद्वारे dydnagpur@rediffmail.com यावर तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे. केवळ राज्याच्या शिक्षण विभागाशी संलग्नित शाळेतील पालकांनीच नव्हे तर सीबीएसई शाळांच्या पालकांनाही यावर तक्रार करावी असे आवाहन उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Also recovered in the name of books from schools in Corona