
येथील डॉक्टरही गरिबांच्या आजारावर उपचार करीत आहेत. मात्र यासाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. सुपर स्पेशालिटीतील ह्दयविभागात एन्जिओग्राफीपासून तर एन्जिओप्लास्टीसह ह्दरोग शल्यक्रिया विभागात,
नागपूर : राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेचे लक्ष कोरोना नियंत्रणात लागले आहे. तर खासगी वैद्यकीय सेवा केवळ ४० टक्के सुरू आहे. अशावेळी कोरोना व्यतिरिक्त इतर आजारावर मेडिकलच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलशिवाय पर्याय नाही.
येथील डॉक्टरही गरिबांच्या आजारावर उपचार करीत आहेत. मात्र यासाठी कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. सुपर स्पेशालिटीतील ह्दयविभागात एन्जिओग्राफीपासून तर एन्जिओप्लास्टीसह ह्दरोग शल्यक्रिया विभागात, गॅस्ट्रो इंट्रोलॉजी विभागात दर दिवसाला रुग्णांवर शस्त्रक्रियांसह आवश्यक प्रक्रिया होत आहे. यामुळेच सुपर गरिबांसाठी नेहमीच वरदान ठरले आहे. विशेष असे की, कोरोनाकाळात हृदयावर शस्त्रक्रिया करणारे राज्यात नागपुरातील सुपर हे एकमेव सरकारी रुग्णालय आहे, असा दावा करण्यात आला आहे.
सुपरच्या हृदयरोग विभागात पूर्वी एका दिवशी २० ॲन्जिओग्राफी होत असत. तर किमान दोन किंवा तीन एन्जिओप्लास्टी होत असत. यात पन्नास टक्के सेवा आजही सुरू आहेत. विशेष असे की, या विभागात एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले. मात्र त्यानंतरही त्याच्यावर प्रक्रिया करण्यात आली. तर हृदयरोग शल्यक्रिया विभागात आठवड्यातून किमान ५ जणांच्या तरी हृदयावर शल्यक्रिया केली जात आहे. यांपैकी अनेक रुग्ण रक्तवाहिन्यांतील अडथळ्यामुळे मृत्यूच्या दारात पोचले होते.
मात्र बायपास शल्यक्रिया करून रक्तवाहिन्यांमधील अवरोध दूर करण्यात सुपरला यश आले. हृदयरोग शल्यक्रिया विभागाने कुठलाही गाजावाजा न करता अवघ्या मागच्या एक महिन्यात २६ जणांच्या हृदयावर शल्यक्रिया केल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. कार्डिऑलॉजी विभागाने ५८ रुग्णांच्या हृदयातील मुख्य रक्तवाहिन्यांमधील अवरोध दूर करून त्यांना जीवनदान दिले आहे. हृदयरोग विभागात कोरोना काळात १०० पेक्षा अधिक ॲन्जिओप्लास्टी करण्यात आल्या आहेत.
बीपीएलग्रस्तांच्या नोंदीतील हृदयविकाराच्या रुग्णांसाठी मुंबईत २ आणि पुण्यात एक तर उपराजधानीत एक अशी चार सरकारी रुग्णालयात हृदय शल्यक्रिया सेवा उपलब्ध आहे. कोरोनाच्या भय असल्याने मुंबई- पुण्यातील हृदयशल्यक्रियांना थांबा लागला आहे. मात्र नागपूरच्या मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटीत गेल्या महिन्याभरात महात्मा फुले जन आरोग्य विमा योजनेतून हृदयावर शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सुपरमधील किडनीग्रस्त रुग्णांसोबतच, मेंदूरोग विभागही गरिबांसाठी वरदान ठरत आहे.
सविस्तर वाचा - मौजमजा करताना ‘ते’ बनले नावाडी, हाकली नाव आणि स्वतःचा ठरले कर्दनकाळ...
गॅस्ट्रोइंट्रॉलॉजी विभागात शल्यक्रिया
कोरोनाच्या संकटकाळात परराज्यातील प्रवासी वाहतूक बंद असतानाही अनेक जण खासगी वाहनाने शहरात आले. मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणातून उपचाराला येणाऱ्यांची संख्या या काळात कमी झाली आहे. मात्र तरीही सुपरच्या गॅस्ट्रोइंट्रॉलॉजी विभागात दर दिवसाला किमान १० ते १५ प्रक्रिया (प्रोसिजर्स) होत आहेत. दुर्बिणीद्वारे होणारी एन्डोस्कोपी, कोलोनोस्कोपी, एन्डोसोनो, एन्डोस्कोपिक अल्ट्रासाऊंड सारख्या प्रक्रियांचा समावेश असल्याची माहिती आहे. याला सुपरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुजोरा दिला.
संपादन - अथर्व महांकाळ