'पत्नीकडे पैशांची मागणी करणे म्हणजे छळवणूक नाही'; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निकाल

टीम ई सकाळ 
Monday, 1 February 2021

अजून एक धक्कादायक निकाल नागपूर खंडपीठाकडून देण्यात आला आहे.  

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून  एकपेक्षा एक अजब निकाल येत आहेत. न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी गेल्या काही दिवसांत स्त्री शोषणाबाबत आणि लैंगिक छळाबाबत प्रश्न निर्माण होईल असे निकाल दिले आहेत. यात भर म्हणून आता अजून एक धक्कादायक निकाल नागपूर खंडपीठाकडून देण्यात आला आहे.  

पँटची झिप उघडी ठेवणं म्हणजे लैंगिक अत्याचार नाही असा निकाल काही दिवसांपूर्वी न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी दिला होता. मात्र आता  पत्नीकडे पैशाची मागणी करणं म्हणजे गैरवर्तन नव्हे. त्यामुळे भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 498 (ए)नुसार पतीनं पत्नीचा छळ केला असं मानलं जाऊ शकत नाही, असं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं व्यक्त केलंय. इतकंच नव्हे तर लग्नाच्या नऊ वर्षानंतर पत्नीनं केलेल्या आत्महत्येच्या आरोपातून पतीची निर्दोष सुटकाही केली आहे. 

नक्की वाचा - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी

नक्की काय आहे प्रकरण

पत्नीच्या घरच्यांकडून हुंडा मिळत नसल्यामुळे पतीनं आणि सासरच्या लोकांनी अमानुष छळ करून आपल्या मुलीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं अशी तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दारव्हा पोलिस ठाण्यात केली होती. यावरून यवतमाळ सत्र न्यायालयाने पती प्रशांत जरे यांना 2 एप्रिल, 2008 रोजी दोषी ठरवलं होतं. त्यांच्या गुन्ह्यांसाठी त्यांना एकूण चार वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र या शिक्षेविरोधात जरे यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

काय म्हणाल्या न्यायमूर्ती 

जरे पती-पत्नीमधील भांडणं पैशासाठी होत असे आणि त्यासाठी तो तिला मारहाण करीत असे. हा पुरावा मानताही येईल, मात्र, पत्नीकडे पैशाची मागणी करणं ही गैरवर्तनाची अस्पष्ट संज्ञा आहे. इथे त्याचा वापर इतर कोणतेही तपशील नसतानाही जोडण्यात आला आहे. त्यामुळे आयपीसी कलम 498 (ए) नुसार पतीने पत्नीचा छळ केल्याचा गुन्हा सिद्ध होत नाही. असं निरीक्षण न्यायमूर्ती पुष्पा गनेडीवाला यांनी मांडलं. तसंच आरोपीला पत्नीला सोडून देण्यापेक्षा तिच्या सहवासात राहण्यास जास्त रस होता. त्यासाठीच पत्नीसोबत भांडण झाल्यानंतरही तो तिला तिच्या माहेरून परत घरी आणत असे आणि तिने येण्यास नकार दिल्यास तिला वैवाहिक बंधन टिकवण्यासाठी नोटिसा पाठवत होता असंही न्यायालयानं नमूद केलं. 

पतीनंच पाजलं होतं विष? 

जरे यांनी आपल्या पत्नीला मारहाण करून तिला स्वतःच विष पाजताण त्यांच्या धाकट्या मुलीनं बघितलं होतं. तसा जबाबही तिनं पोलिसांना दिला होता. मात्र तरीही या प्रकरणी ही हत्या नसून आत्महत्या असल्याची नोंद पोलिसांनी केली होती. 

जाणून घ्या - ऋतूंचा अजब खेळ! दोन दिवसांत तब्बल ६ अंशांनी घसरला पारा; फेब्रुवारीत 'या' दिवसांत पावसाचीही शक्यता   

पतीची निर्दोष मुक्तता 

आयपीसी कलम 498(ए) नुसार इथं पतीने पत्नीचा छळ केला असे मानले जाऊ शकत नाही, असं स्पष्ट करत हायकोर्टानं पत्नीच्या आत्महत्येच्या आरोपातून आरोपी पतीची आणि त्याच्या कुटुंबियांची निर्दोष सुटका केली. मात्र आता न्यायालयाच्या या निर्णयावर मतं व्यक्त करण्यात येत आहेत. 

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Another verdict from Nagpur Bench of Mumbai High Court about woman