सैन्यातील महिला अधिकाऱ्याला फेसबुक फ्रेंडचा हिसका, तब्बल एवढ्या लाखांचा घातला गंडा

अनिल कांबळे
Wednesday, 16 September 2020

काही दिवसांपूर्वी एका युवकाने महिलेला फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. महिलेने ती एक्सेप्ट केली. त्यानंतर तो महिलेसोबत चॅटिंग करायला लागला. अमेरिकेत एका बड्या कंपनीत अधिकारी असल्याचे त्याने महिलेला सांगितले. महिलेचा विश्वास संपादन केला.

नागपूर : सोशल मीडियाचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही आहेत. सोशल मीडियावर वावरताना अतिशय जपून आणि जबाबदारीने वागावे लागते. याबाबत अनेकदा माहितीही दिली जाते. परंतु बरेच जणांकडून त्याच त्या चुका केल्या जातात. असाच काहीसा प्रकार नुकताच उघडकीस आला. फेसबुकवरून युवकाशी मैत्री करणे महिलेला चांगलेच महागात पडले. गिफ्टच्या नावे त्या तरुणाने महिलेला लाखो रुपयांनी गंडवले. अखेर झालेला संपूर्ण प्रकार घरी सांगून पोलिसांकडे धाव घ्यावी लागली.

भारतीय सैन्यात अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या महिलेशी एका युवकाने फेसबुकवरून मैत्री केली. तिच्याशी व्हॉट्सॲप चॅटिंग करीत तासांतच बोलायला लागला. महिलेचा विश्वास संपादन केला. मैत्री घट्ट झाल्यानंतर तिला वारंवार गिफ्टच्या नावाखाली आणि अन्य आमिष दाखवून ४१ लाख ७० हजार रुपयांनी गंडा घातला. पैसे घेतल्यानंतरही ब्लॅकमेल करीत महिलेला बदनामीची धमकी देत होता. महिलेने सावध पवित्रा घेत पतीला सर्व हकिकत सांगून गिट्टीखदान पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनी अमेरिकन मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अधिक माहितीसाठी - बारा दिवसांची चिमुकली गंभीर आजाराने ग्रासलेली अन् घरात अठरा विश्व दारिद्र्य, मग काय करणार ते मायबाप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला निवृत्त मुख्य परिचारिका असून, तिचे पतीही लष्कराचे निवृत्त कॅप्टन आहेत. दोघे गिट्टीखदान भागात राहतात. काही दिवसांपूर्वी एका युवकाने महिलेला फेसबुकवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. महिलेने ती एक्सेप्ट केली. त्यानंतर तो महिलेसोबत चॅटिंग करायला लागला. अमेरिकेत एका बड्या कंपनीत अधिकारी असल्याचे त्याने महिलेला सांगितले. महिलेचा विश्वास संपादन केला.

अमेरिकेतून महागडे गिफ्ट पाठवीत असल्याचे त्याने सांगितले. १५ जुलैला दिल्ली विमानतळावर गिफ्ट पोहोचले आहे. कस्टम अधिकाऱ्यांच्या ताब्यात ते गिफ्ट आहे. गिफ्ट सोडविण्यासाठी पैसे जमा करावे लागतील, असे तो महिलेला म्हणाला. त्यानंतर महिलेने पैसे जमा केले. महिलेकडे लाखो रुपये असल्याचे त्याला कळले. त्याने महिलेला ‘हवाला’प्रकरणात अडकविण्याची धमकी दिली. महिला घाबरली. तिने वेळोवेळी युवकाच्या विजया बँक, इको बँक, कॅनरा बँक, एचडीएफसी बँकेतील खात्यात एकूण ४१ लाख ७० हजार रुपये जमा केले.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

दरम्यान याबाबत परिचारिकेच्या पतीला माहिती मिळाली. त्याने पत्नीला विचारणा केली. त्यानंतर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. पैसे भरलेल्या सर्व बॅंक अधिकाऱ्यांशी पोलिस संपर्क करीत असून, अकाउंटबाबत पोलिस माहिती घेत आहेत. खात्यातील पैसे फ्रीज करण्यासाठी सायबर पोलिस प्रयत्न करीत आहेत.

संपादन : अतुल मांगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A army woman officer was robbed by a Facebook friend