महापौर संदीप जोशींसह वीस जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

नागपूर महापालिकेत 2005 साली स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद उफाळला होता. त्यावरून विद्यमान महापौर संदीप जोशी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी महापालिकेत गोंधळ घातला होता. तत्कालीन महापौर आमदार विकास ठाकरे व सत्तापक्षातील सदस्यांनी आक्षेप घेत तक्रार केली होती.

नागपूर : महापौर संदीप जोशी, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांच्यासह 20 जणांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. माजी नगरसेवक सुभाष अपराजित, ममता भोयर आणि मृत्यू झालेल्या अन्य एकाला न्यायालयाने दिलासा दिला आहे.

सविस्तर वाचा - व्वा रे प्रशासन! मालकी पट्टे वितरणाची फाईलच गहाळ

नागपूर महापालिकेत 2005 साली स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान कॉंग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद उफाळला होता. त्यावरून विद्यमान महापौर संदीप जोशी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी महापालिकेत गोंधळ घातला होता. तत्कालीन महापौर आमदार विकास ठाकरे व सत्तापक्षातील सदस्यांनी आक्षेप घेत तक्रार केली होती. न्याय दंडाधिकाऱ्यांनी अनेक वेळा नोटीस देऊन देखील गैरहजर राहिल्याबद्दल महापौर संदीप जोशी, भाजप नेते प्रवीण दटके, संजय बंगाले यांच्यासह भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांविरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले आहे. याच प्रकरणात 2016 मध्ये सुद्धा त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट निघाले होते.

"क्रॉस व्होटिंग'वरून वाद
दरम्यान, 2005 सालच्या काळात महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता होती. त्या वेळी पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विकास ठाकरे महापौर होते. त्या दरम्यान महालमधील टाउनहॉलच्या सभागृहात स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुरू होती. "क्रॉस व्होटिंग'वरून दोन्ही पक्षांत वाद उफाळला होता.

पोलिस ठाण्यात तक्रारी
त्यातून दोन्ही पक्षांचे नगरसेवक आमोरासमोर आले आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे सभागृह स्थगित करावे लागले. सभागृहाच्या बाहेरसुद्धा नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ घालण्यात आला होता. त्यामुळे कोतवाली पोलिस ठाण्यात दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या होत्या. अनेक नगरसेवकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पोलिस ठाण्यातूनच नगरसेवकांना जामीन मिळाला होता. अनेक वर्षे या प्रकरणावर पडदा पडला असताना 2016 ला महापौर प्रवीण दटके यांच्यासह 22 जणांविरुद्ध वॉरंट काढण्यात आले होते. न्यायालयाने दिलेल्या तारखेत उपस्थित न राहिल्यामुळे हे वॉरंट काढण्यात आले. त्यानंतर आता 2020ला महापौर संदीप जोशी यांच्यासह 20 जणांविरुद्ध वॉरंट काढण्यात आले आहे. दरम्यान, हे वॉरंट रद्द करण्याकरिता संदीप जोशी यांच्यातर्फे ऍड. उदय डबले हे न्यायालयात अर्ज दाखल करणार असल्याचे कळते.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrest warrant for Mayor Sandip Joshi & Twenty people