व्वारे प्रशासन ! मालकी पट्‌टे वितरणाची फाइलच गहाळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 फेब्रुवारी 2020

वाडी न. प. हद्दीत 40 वर्षांपासून गरीब व शोषित जनता डॉ. आंबेडकरनगर, गौतमनगर, इंदिरानगर आदी ठिकाणी शासकीय जागेवर निवास करीत आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दीर्घ कालावधीपासून अशा प्रकारच्या जागेचे नियमितीकरण करून मालकी पट्‌टे वाटप करण्याचे धोरण आहे.

वाडी (जि.नागपूर) :  नगर परिषद कार्यालयातून परिसरातील दलित वसाहतीच्या मालकी पट्‌टे वितरणाची फाइलच गहाळ करण्यात आली. या प्रकरणाकडे तत्कालीन सत्ताधारी पक्षाने हेतुपूर्वक दुर्लक्ष केल्याने ठराव मंजूर असूनही कार्यवाही केली नसल्याचा गंभीर आरोप बहुजन समाज पक्षाने एका पत्रकार परिषदेतून व्यक्त केला.

क्‍लिक करा : नागपूर जिल्हापरिषदेत महिलांचे वर्चस्व, सहापैकी चार पदांवर महिला

बसप संतप्त; प्रशासनाला दिली सात दिवसांची मुदत

बहुजन समाज पक्षाचे हिंगणा विधानसभाप्रमुख प्रणय मेश्राम, शहराध्यक्ष राहुल सोनटक्‍के व नगरसेवक नरेंद्र मेंढे यांनी चर्चेत सांगितले की, वाडी न. प. हद्दीत 40 वर्षांपासून गरीब व शोषित जनता डॉ. आंबेडकरनगर, गौतमनगर, इंदिरानगर आदी ठिकाणी शासकीय जागेवर निवास करीत आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार दीर्घ कालावधीपासून अशा प्रकारच्या जागेचे नियमितीकरण करून मालकी पट्‌टे वाटप करण्याचे धोरण आहे.

क्‍लिक करा :  मजुबती का नाम महात्मा गांधी हेच खरे

आंदोलनाचा इशारा
या अनुषंगाने वाडी नगर परिषदेत बसपच्या नगरसेवकांनी 2015-16 ला न. प.च्या सभेत हा विषय प्रस्तुत केला. आज-उद्या मंजुरी येईल, या आशेत सर्व असताना 4 वर्षे होऊनही या प्रकरणात काहीच कार्यवाही दिसून आली नाही. या संदर्भात बसपने वाडी न. प.चे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांच्याकडे कार्यवाहीची मागणी केली. या प्रकरणाची प्रस्ताव फाइलच नगर परिषद कार्यालयात उपलब्ध नसल्याची बाब उघड झाली. मुख्याधिकाऱ्यांनी या संदर्भात अधिक चौकशी करून माहिती देण्याचे बसपला सांगितले. गत 4 वर्षांपासून पट्‌टे वाटप न झाल्याने वाडी परिसरातील 1 हजार गरीब नागरिक केंद्र व राज्य सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित होत असल्याने तीव्र असंतोष पसरला आहे.

क्‍लिक करा : नागरिकांनी हिसका दाखविताच घरोघरी शुद्‌ध जलवितरण

असा झाला घोटाळा
या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सत्य शोधले असता, अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या. भूमिअभिलेख कार्यालयाचे अधिकारी ज्यांच्याकडे हे पट्‌टे मोजण्याचे कार्य निश्‍चित होते. त्यांनी माहिती दिली की, वाडीतील हे नियोजित पट्‌टे मोजण्याचे कार्य राजेश मिश्रा नामक व्यक्तीच्या संस्थेला देण्यात आले होते. या व्यक्तीने फाइल आपल्या ताब्यात तर घेतली. मात्र, 4 वर्ष होऊन ना मोजमाप केले ना ही फाइल पुढे सरकली. आमदार समीर मेघे यांना बुटीबोरीचा हा प्रश्न दिसला. पण, 4 वर्षांपासून वाडीचे पट्‌टे वाटप दिसले नाही. यामुळे त्यांनीही हा प्रश्न सुटावा अशी कार्यवाही केल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप बसपच्या नगरसेवकांनी केला. मुदतीत कार्यवाही न झाल्यास पक्षातर्फे आंदोलन व बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेत अमित तायडे, वीरेंद्र कापसे, राष्ट्रपाल वाघमारे, मनीष रामटेके आदी उपस्थित होते.

क्‍लिक करा : करोनाचे नागपुरात पाउल तर नव्हे, चाचणीसाठी व्यापारी मेडिकलमध्ये

प्रस्तावाला मंजुरी मिळेल
कदाचित ही फाइल सर्व्हेक्षण करणाऱ्या संस्थेकडे असेल. ती मिळेल. पट्‌टे मोजणीचे कार्य झाले आहे. विलंब निश्‍चित झाला. पण, हे कार्य पूर्ण होताच एसडीओंकडे अहवाल पाठवून या प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यात येईल. आंदोलनाची गरज पडणार नाही.
-जुम्मा प्यारेवाले
मुख्याधिकारी, नगर परिषद, वाडी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Missing ownership lease distribution file