साहेबऽऽ आता आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार; पिककर्जाची अत्यंत गरज

गुरुदेव वनदुधे
Thursday, 5 November 2020

येथील शेतकरी राजकुमार ठवकर पिककर्जासाठी दोन महिन्यांपासून बँकेचे उंबरठे झिजवित आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी पीक लागवडीसाठी सावकराकडून कर्ज घेऊन नंतर बँकेचे कर्ज मिळाल्यानंतर सावकाराचे पैसे द्यायचे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पचखेडी (जि. नागपूर) : सरकार शेतकऱ्यांना कसलाही त्रास होणार यासाठी मोठमोठे निर्णय घेत आहे. मात्र, ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी घात केल्यावर घोंगडे पांघरण्यासारखी गत शेतकऱ्यांची झाल्याची बाब पचखेडी येथील लाभार्थी युवा सुशिक्षित शेतकरी राजकुमार ठवकर यांच्यावर आली आहे. आठ दिवसांच्या आत कर्ज न दिल्यास आत्महत्या करण्याची रितसर परवानगी घेणार असल्याचे अन्यायग्रस्त शेतकरी राजकुमार ठवकर यांनी सांगितले.

सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी केली. त्यात नव्याने पिककर्ज देण्यासाठी आदेश पारित केले. पिककर्ज म्हणजे पिक लागवडीपासून पीक निघेपर्यंत येणारा खर्च भागवून आलेल्या उत्पन्नातून कर्ज परतफेड करणे. मात्र, आजघडीला खरीप हंगाम गेला असून रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा - आता जनावरांचेही ‘पशू आधार कार्ड’; जनावरांची माहिती एकाच क्लिकवर

मात्र, येथील शेतकरी राजकुमार ठवकर पिककर्जासाठी दोन महिन्यांपासून बँकेचे उंबरठे झिजवित आहेत. तेव्हा शेतकऱ्यांनी पीक लागवडीसाठी सावकराकडून कर्ज घेऊन नंतर बँकेचे कर्ज मिळाल्यानंतर सावकाराचे पैसे द्यायचे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेत कमलाबाई ठवकर यांचे नाव होते. मात्र, त्या मरण पावल्याने वारसान असलेले मुलगा राजकुमार ठवकर यांनी कागदपत्रांची पूर्तता करून सुध्दा दोन महिने लोटल्यानंतरही आजपावोतो त्यांना पिककर्ज मिळालेले नाही. तेव्हा सरकार पिककर्ज देते की मळणी कर्ज, असाही प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत.

सविस्तर वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा

फाईल झोनल ऑफिसला पाठवली
राजकुमार ठवकर यांची कर्ज फाईल झोनल ऑफिसला पाठविलेली आहे. माझा कोणताही ग्राहक नाराज होणार नाही याची मी काळजी घेतो. पण त्यांची फाईल पास होऊन आली नसल्याने विलंब होत आहे.
- गौरवकुमार,
व्यवस्थापक, अलाहाबाद बँक शाखा, पचखेडी

रब्बी पिकांची लागवड कशी करायची
मला पिककर्जाची अत्यंत गरज असल्याने कर्जाची मागणी केली. आता उधारउसने व्याजाने सावकारांकडून कर्ज घेऊन खरिपाची लागवड केली. त्यातही निसर्गाने दगा दिल्याने तेही पीक नेस्तनाबूद झाले. आता रब्बी पिकांची लागवड कशी करायची, हा मोठा यक्षप्रश्न आहे.
- राजकुमार ठवकर,
युवा शेतकरी

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The farmer hits round the bank for crop loan