ब्रेकिंग! सीबीआयची नागपुरात कारवाई; लाच घेणारा सहायक कामगार आयुक्त जाळ्यात

अनिल कांबळे
Thursday, 31 December 2020

तक्रारदार कार्यालयात येणार असल्याने अधीक्षक निर्मला देवी यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआयच्या पथकाने कामगार आयुक्तालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच घेताच सीबीआयच्या पथकाने शेलार यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणात आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे,

नागपूर : रेल्वेचे कंत्राट घेतलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्याकडून ६० हजारांची लाच घेणाऱ्या सहायक कामगार आयुक्ताला केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. सचिन जे. शेलार असे सहायक आयुक्ताचे नाव आहे. मेसर्स प्रेमको रेल्वे इंजीनिअर्स लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अभियंते यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीने बडनेरा येथे रेल्वे व्हॅगन सुधारण्याचे कंत्राट घेतले आहे. १३ डिसेंबरला विभागीय कामगार आयुक्त टी. के. सिंग व शेलार यांनी बडनेरा येथील कार्यशाळेची पाहणी केली. या ठिकाणी श्रमिकांच्या सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना नसल्याचे दोन्ही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले. दस्तऐवज घेऊन नागपुरातील कार्यालयात हजर राहण्यास सांगितले.

अधिक माहितीसाठी - साहस! कारंजातील दोन दिव्यांग करणार ‘कळसूबाई़’ सर; नव्या वर्षाच्या स्वागतासाठी उपक्रम

१६ डिसेंबरला तक्रारदार सीजीओ कॉप्लेक्समधील कामगार आयुक्तांच्या कार्यालयात गेला. त्याने टी. के. सिंग यांची भेट घेतली. ‘शेलार यांना भेटा’ असे सिंग हे तक्रारदाराला म्हणाले. तक्रारदार हा शेलार यांना भेटायला गेला. मात्र, शेलार यांनी तक्रारदराला भेटण्याचे टाळले. तक्रारदार परत गेला. सायंकाळी सिंग यांनी तक्रारदाराच्या मोबाइलवर संपर्क साधून शेलार यांच्यासोबत बोला, असे सांगितले. तक्रारदाराने शेलार यांच्याशी संपर्क साधला. शेलार यांनी त्याला घरी भेटायला बोलाविले.

तक्रारदाराला संशय आला. शेलार लाच मागणार असल्याची शंका त्याला आली. त्याने दोन दिवसांचा अवधी मागितला. तक्रारदाराने १८ डिसेंबरला सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने तक्रारीची पडताळणी केली. याचदरम्यान शेलार यांनी तक्रारदाराला ६० हजार रुपयांची लाच मागितली. मंगळवारी कार्यालयात भेटायला बोलाविले.

क्लिक करा - बेपत्ता झालेल्या कामगाराचा शोध होता सुरु अन् अचानक आढळली तलावाजवळ चप्पल; दृश्य बघून अंगाचा उडाला थरकाप

तक्रारदार कार्यालयात येणार असल्याने अधीक्षक निर्मला देवी यांच्या मार्गदर्शनाखाली सीबीआयच्या पथकाने कामगार आयुक्तालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून लाच घेताच सीबीआयच्या पथकाने शेलार यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणात आणखी कोणा-कोणाचा सहभाग आहे, यासह वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेचाही तपास करण्यात येत असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले.

५२ लाख जप्त, दोन पर्यंत कोठडी

लाच घेताना रंगेहात अटक केल्यानंतर सीबीआयच्या पथकाने शेलार यांच्या घराची झडती घेतली. पथकाने त्यांच्या घरातून ५२ लाख नऊ हजारांची रोख व कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे दस्तऐवज जप्त केले. दरम्यान, सीबीआयने शेलार यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची दोन जानेवारीपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Assistant Labor Commissioner caught taking bribe CBI news