क्वॉटर रिकामे असल्याचा फायदा घेत अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे; रेल्वे कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई

अमर मोकाशी
Friday, 1 January 2021

ही बाब कुणालाही सांगू नये यासाठी त्याने दोघींनाही काही पैसेसुद्धा दिलेत. मात्र, घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या मुलींनी सायंकाळी आई-वडील कामावरून घरी परतल्यानंतर घटनेची माहिती सांगितली. संतापलेल्या पालकांनी लगेच पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.

भिवापूर (जि. नागपूर) : अल्पवयीन मुलीना खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवत घरात बोलावून लैंगिक चाळे करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना बुधवारी सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या क्वॉटरमध्ये घडली. नरेश कुमार दयानंद शौकीन (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. तो रेल्वेच्या नागभीड डिविजनमध्ये ट्रकमन म्हणून नोकरीला आहे.

मागील काही दिवसांपासून तो येथील रेल्वेच्या सर्वंट क्वाटरमध्ये एकटाच राहात आहे. बुधवारी (ता. ३०) याच क्वाटरपासून काही अंतरावर असलेल्या वस्तीतील सुमारे ११ वर्षे वयाच्या दोन मुली त्याच्या घरासमोरील अंगणात खेळत होत्या. चार वाजताच्या सुमारास आरोपी नरेशकुमार याची नजर त्यांच्यावर पडली. त्याने खाऊ विकत घेण्यासाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून दोघींनाही घरात बोलावले व अश्लील चाळे केले.

अधिक वाचा - ‘फिट इंडिया’त वर्धा जिल्हा राज्यात दुसरा; मुंबई पहिल्या क्रमांकावर, राज्यातील शाळा नोंदणी ४६.२५ टक्‍के

ही बाब कुणालाही सांगू नये यासाठी त्याने दोघींनाही काही पैसेसुद्धा दिलेत. मात्र, घडलेल्या प्रकाराने घाबरलेल्या मुलींनी सायंकाळी आई-वडील कामावरून घरी परतल्यानंतर घटनेची माहिती सांगितली. संतापलेल्या पालकांनी लगेच पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपी नरेशकुमार याला क्वॉटरमधून अटक करून बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस अधिकारी खोब्रागडे पुढील तपास करीत आहे.

रेल्वे स्टेशन परिसर झाला ओसाड

नागपूर-नागभीड रेल्वे मार्ग ब्राँड गेजमध्ये परावर्तीत होणार असल्याने या मार्गावरील रेल्वे बंद करण्यात आली आहे. तेव्हापासून येथील रेल्वे स्टेशन परिसर ओसाड बनला आहे. रेल्वे स्टेशन परिसराला लागून दिघोरा ही मजुरांची वस्ती आहे. स्टेशन परिसरात असलेले बहुतांश सर्वंट क्वॉटर रिकामे आहेत. त्यातीलच एका क्वॉटरमध्ये काही दिवसांपासून आरोपी नरेशकुमार वास्तव्यास आहे. कुणी नागरिक सहसा या क्वॉटरकडे भटकत नाही. त्याचाच फायदा घेत नरेशकुमारने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Atrocities on a minor girl in rural Nagpur crime news