वाढदिवसाच्या पार्टीत मित्रावर हल्ला; नाचताना धक्का लागल्याचे कारण 

अनिल कांबळे
Wednesday, 7 October 2020

वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन त्याने केले होते. त्याने इतरांसह फिर्यादीला बोलवले होते. बुद्धनगर गुरुद्वारा परिसरातील रस्त्यावर डीजे लावून सर्व जण नृत्य करीत असताना निक्कू सरदार याचा शाहबाज खान नावाच्या तरुणाला धक्का लागला. यावरून त्यांच्यात वाद झाला.

नागपूर  : वाढदिवसाची पार्टी साजरी करीत असताना मित्रांमध्ये झालेल्या भांडणात एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पाचपावली पोलिस ठाण्यांतर्गत घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

अनमोल सलुजा (वय  २०), निक्कू सरदार (वय ३०), सब्बी गोतरा (वय २८), अंगद मुल्ला (वय २६) आणि जसप्रीत तुली (वय २०) सर्व रा. बुद्धनगर, पाचपावली अशी आरोपींची नावे आहेत. मोहम्मद नावेद सैफी शाहीद नदीम रा. मोमीनपुरा असे फिर्यादीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी जसप्रीत तुली याचा वाढदिवस होता. 

अधिक वाचा - निष्काळजीपणाचा कळस! पती कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतरही नेले घरी; दुसऱ्या दिवशी मृत्यू होताच पत्नीविरुद्ध गुन्हा
 

वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन त्याने केले होते. त्याने इतरांसह फिर्यादीला बोलवले होते. बुद्धनगर गुरुद्वारा परिसरातील रस्त्यावर डीजे लावून सर्व जण नृत्य करीत असताना निक्कू सरदार याचा शाहबाज खान नावाच्या तरुणाला धक्का लागला. यावरून त्यांच्यात वाद झाला. ते एकमेकांना शिवीगाळ करीत असताना नावेद मध्यस्थी करण्यासाठी गेला. 

त्यावेळी आरोपींनी संगनमताने त्याच्यावर फायटर व कटियारने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. यामुळे नावेद याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्याला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी नावेद याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू होता. 

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलस्वाराला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. मृतक सावित्रीबाई फुलेनगर निवासी कैलाश शिवराम पाटील (४२) आहेत. पोलिसांनी आरोपी चालक रहाटे कॉलनी निवासी किशोर रामरतन जांगीड (५५) विरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलाश सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास एमएच-३१/जीएक्स-२५१७ क्रमांकाच्या मोटारसायकलने कामावरून घरी जात होते. तुकडोजी पुतळ्यापासून वंजारीनगरकडे जाताना पाण्याच्या टाकीजवळ कार क्र. एमएच-३१/एफई-११९२ चा चालक किशोरने समोरून भरधाव येत कैलाशच्या वाहनाला धडक दिली. यात कैलाश गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. कैलाशला उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. 
 
संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on a friend at birthday party