युवकावर प्राणघातक हल्ला; वाहनाची तोडफोड; भरधाव वाहन चालविल्याचा वाद

अनिल कांबळे 
Tuesday, 3 November 2020

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकरा वाजतादरम्यान रत्नमाला मसराम या वस्तीतील लोकांशी बोलत उभ्या होत्या. त्याचवेळी आरोपी शुभम बारापात्रे दुचाकीने भरधाव त्यांच्याजवळून गेला.

नागपूर ः भरधाव वाहन चालविणाऱ्या युवकाला फटकारल्यावरून झालेल्या भांडणात ८ आरोपींनी एका युवकावर प्राणघातक हल्ला करीत परिसरात उभ्या वाहनांची तोडफोड केली आणि फरार झाले. या प्रकरणी पोलिसांनी गोंडपुरा, पाचपावली निवासी रत्नमाला देवराव मसराम (५५) च्या तक्रारीवरून आरोपींवर गुन्हा नोंदविला. आरोपींमध्ये वस्तीत राहणारा शुभम बारापात्रे (३०) आणि त्याच्या साथीदारांचा समावेश आहे.

जाणून घ्या - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री अकरा वाजतादरम्यान रत्नमाला मसराम या वस्तीतील लोकांशी बोलत उभ्या होत्या. त्याचवेळी आरोपी शुभम बारापात्रे दुचाकीने भरधाव त्यांच्याजवळून गेला. अचानक घडलेल्या या प्रकाराने त्या दचकल्या. त्यांनी शुभमला वस्तीतून भरधाव वाहन चालविण्यावरून फटकारले. 

यामुळे चिडलेल्या शुभमने त्यांच्याशी वाद घातला. आईसोबत भांडण होताना पाहून रत्नमाला यांचा मुलगा विशाल (२८) हा आरोपीची समजूत काढण्यासाठी आला. मात्र, आरोपीने त्याच्याशीही भांडण सुरू केले. या दरम्यान वस्तीतील लोक गोळा होताना पाहून शुभमने तेथून पळ काढला. काही वेळाने तो आपल्या आठ साथीदारांसह पुन्हा परतला. 

सविस्तर वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

सर्वांच्या हातात लाकडी दांडे होते. आरोपींनी विशालला जबर मारहाण केली. त्याच्या डोक्यावर दांड्याने वार करून गंभीर जखमी केले. यानंतर आरोपींनी परिसरात हैदोस घालत वाहनांची तोडफोड केली आणि फरार झाले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. जखमी विशालवर उपचार सुरू आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attack on man due to fight on rash driving