चारित्र्यावर संशय घेत पत्नी व सासूच्या हत्येचा प्रयत्न; पती अटकेत

योगेश बरवड
Saturday, 7 November 2020

गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारात मायलेकी घरी हॉलमध्ये बसून भाजी तोडत होत्या. त्याचवेळी दिलीपही घरी आला. पती-पत्नीत पुन्हा वाद उफाळून आला. संतापाच्या भरात दिलीपने घरासमोर पडून असलेली मुलाची बॅट घेऊन वर्षाला मारहाण सुरू केली. मुलीला वाचविण्यासाठी कासाबाई यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केली.

नागपूर : चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीसोबत वाद उकरून काढला. रागाच्या भरात बॅटने पत्नी व सासूच्या डोक्यावर फटके हाणून दोघींच्याही हत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी सायंकाळी मानकापूर हद्दीतील श्रीकृष्णनगरात हा थरारक घटनाक्रम घडला. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप बुकने (५२, रा. श्रीकृष्णनगर) असे आरोपी पतीचे नाव आहे. पत्नी वर्षा बुकने (४१) व सासू कासाबाई शेगोजी खेवले (७३) यांच्यावर कोराडी मार्गावरील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिघेही सोबतच राहत होते. दिलीप नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. संशयखोर वृत्तीमुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे.

अधिक माहितीसाठी - हायवेने प्रवास करीत असाल तर दंडाचे पाचशे रुपये जवळ ठेवा!

गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारात मायलेकी घरी हॉलमध्ये बसून भाजी तोडत होत्या. त्याचवेळी दिलीपही घरी आला. पती-पत्नीत पुन्हा वाद उफाळून आला. संतापाच्या भरात दिलीपने घरासमोर पडून असलेली मुलाची बॅट घेऊन वर्षाला मारहाण सुरू केली. मुलीला वाचविण्यासाठी कासाबाई यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण केली.

डोक्यात सैतान संचारलेला दिलीप दोघींच्याही डोक्यावर जोरात फटके हाणत होता. आरडाओरड ऐकून शेजारी मदतीला धावून आले. त्यांनी धावपळ करीत दोघींनाही खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी वर्षाच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करीत आरोपी पतीला अटक केली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Attempted murder of wife and mother in law