उधारीच्या पैशांचा वाद विकोपाला, भरदुपारी घडला थरार

Auto driver murdered over money dispute
Auto driver murdered over money dispute

नागपूर  ः पैशांच्या वादातून गुंडप्रवृत्तीच्या ऑटोचालकाची धारदार शस्‍त्राने वार करीत निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी भरदुपारी घडलेल्या या हत्याकांडामुळे श्रावणनगरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणात चौघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

मोहम्मद आकिब अब्दुल सत्तार शेख (२२) रा. हसनबाग असे मृताचे नाव आहे. पक्या ऊर्फ प्रकाश कोसरे (२१) असे या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव सांगण्यात येते. पक्यासह विशाल ऊर्फ फल्ली गुप्ता (१९), प्रिंस ऊर्फ अजय बोकडे (२०) यांना अटक करण्यात आली असून, १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपी श्रावणनगरातील रहिवासी आहेत. 

पोलिसांच्या माहितीनुसार, आकिब गुंडप्रवृत्तीचा असून ऑटो चालवायचा. त्याच्याविरुद्ध मारहाण आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने पक्याला २० हजार रुपये उधारीवर दिले होते. दोघांमध्ये पैशांवरून वाद सुरू होता. मंगळवारी पैसे देण्याचे पक्याने मान्य केले होते. त्यानुसार अकिब दुपारच्या सुमारास पैसे मागण्यासाठी श्रावणनगरात पक्याकडे पोहोचला. दोघांची भेट होताच पैशांवरूनच त्यांच्यात वाद झाला. 

तिथेच हजर असलेले पक्याचे तीन मित्र त्याच्या मदतीसाठी सरसावले. जवळच्या मैत्री बुद्ध विहाराजवळ यांच्यात वाद सुरू होता. त्याचवेळी आरोपींनी धारदार शस्‍त्राने मानेवर घाव घालीत अकिबला रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. तो ठार झाल्याची खात्री करीत आरोपी पसार झाले. या प्रकाराने परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही भेटी दिल्या. जलदगतीने तपासचक्र फिरवीत दोन तासांच्या आतच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे आकिबच्या मित्रपरिवारात चांगलाच रोष निर्माण झाला. काहींनी घटनास्थळालाही भेट दिली. मंगळवारी रात्री त्याच्या हसनबागेतील घरासमोर मोठी गर्दी उसळली होती.

परिसरात उलटसुलट चर्चा

घटनेनंतर परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली. काहींच्या सांगण्याप्रमाणे आकिब अल्पवयीन मुलावर अंमलीपदार्थ विक्रीचा आरोप लावून वसुली करीत होता. १५ दिवसांपूर्वीही त्याने त्याला बळजबरी ऑटोत बसवून नेले पोलिसात देण्याची धमकी दिली. त्यानंतर मुलाच्या वडिलांकडे एक लाखाच्या खंडणीची मागणी केली. तेव्हापासून मुलगा दहशतीत होता. आज तो मित्रांसोबत घरासमोर बसला असताना अकिब तिथे पोहोचला आणि धमकावणे सुरू केले. यामुळे मुलगा आणि त्याचे मित्र अकिबवर धावून गेले. पकडून त्याच्याकडील चाकू हिसकावून त्याचीच हत्या केल्याचीही एक थेयरी पुढे येत आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत. 


संपादन : अतुल मांगे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com