माणुसकी अजूनही जिवंत! ऑटोचालकाने प्रवाशाला परत केली तब्बल पाच लाखांची बॅग

योगेश बरवड 
Friday, 16 October 2020

कुद्दूस खान असे या कथानकातील नायकाचे नाव. ते पत्नी, तीन मुली व मुलासह मोठा ताजबाग परिसरात वास्तव्यास आहेत. ‘इमान हिच इबादत’ या तत्त्वज्ञान त्यांचा प्रचंड विश्वास आहे.

नागपूर ः कोरोनामुळे घराबाहेर पडणे टाळले जात आहे. परिणामी ऑटोचालकांना प्रवासी मिळणेच कठीण झाले आहे. अशा विषम परिस्थितीतही शहरातील एका ऑटोचालकाने प्रामाणिकतेचा परिचय दिला. ऑटोत विसरलेली पाच लाख रुपये रोख असलेली बॅग चालकाने प्रवाशाचा शोध घेत त्याला परत केली. ऑटोचालकाच्या या प्रामाणिकतेचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

सविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा

कुद्दूस खान असे या कथानकातील नायकाचे नाव. ते पत्नी, तीन मुली व मुलासह मोठा ताजबाग परिसरात वास्तव्यास आहेत. ‘इमान हिच इबादत’ या तत्त्वज्ञान त्यांचा प्रचंड विश्वास आहे. नेहमीप्रमाणेच ते सकाळी ऑटो घेऊन घराबाहेर पडले. शंकरनगरच्या गांधीनगर येथून गांजाखेत चौकापर्यंतची एक सवारी मिळाली. ठरलेल्या ठिकाणी प्रवाशाला सोडून खान पुढल्या सवारीच्या शोधात निघून गेले. 

सुमारे दोन किमी पुढे गेल्यानंतर एका ठिकाणी थांबले असता, मागच्या सीटवर बॅग दिसली. प्रवाशाच्या हातात ही बॅग पाहिल्याचे त्यांच्या लक्षात आले. बॅगच्या शोधात प्रवासी त्याच ठिकाणी परतेल असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता ते गांजाखेत चौकात परतले. संबंधित प्रवासी कावराबावरा होऊन ऑटोचालकांकडे चौकशी करीत असल्याचे दिसले. 

घडले माणुसकीचे दर्शन 

कुद्दूसभाई यांनी लागलीच प्रवाशाला आवाज दिला आणि बॅग त्यांच्या ताब्यात दिली. प्रवाशाने स्वतःच बॅगमध्ये ५ लाखांची रोख असून बॅग घेण्यासाठी अमरावतीहून वाहन खरेदीसाठी आल्याचे सांगितले. हे आपले कामच असल्याने प्रवाशाचा परिचय घेण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. प्रवाशाने कौतुक करीत काही रक्कम त्यांच्या हातात ठेवण्याचाही प्रयत्न केला. पण, कुद्दूसभाईने नम्रतेने त्याला नकार दिला. जाता जाता प्रवाशाने कुद्दूसभाईसोबत फोटो काढून घेतला. कुद्दूसभाई यांच्या एका ऑटोचालक मित्रानेही हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

‘इमान’ हाच जीवनाचा पाया

कुद्दूसभाई यांचा ‘इमान’ हाच जीवनाचा पाया आहे. या पायावरच कुटुंबाची जडणघडण व्हावी. कष्टाची मिळकत नेहमीच ‘बरकत’ देते तर बेईमानी ‘बरबादी’ देते. घाम गाळूनच संसाराचा गाडा हाकतो, त्यातून पाल्यांना संस्कार मिळतो. यामुळे नेहमीच इमानाला महत्त्व देत असल्याचे त्यांनी सांगितले. ते टाईगर ऑटोरिक्षा संघटनेशी संलग्न आहेत. संघटनेकडूनही त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: auto driver returns money of a passenger shows humanity