महिला सुरक्षेसाठी पोलिस विभागाचे एक पाऊल पुढे, केली ही सुविधा... 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

वाहतूक पोलिस या अभिनव अभियानात परवानाधारक ऑटोरिक्षांना क्‍यूआर कोड लावण्यात येणार आहे. त्याचा उपयोग ऑटोरिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना होणार आहे.

नागपूर : नागपूर शहर वाहतूक विभागातर्फे शहरातील ऑटोरिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी "क्‍यूआर कोड' लावण्यात आले आहेत. या अभियानाचा त्याचा शुभारंभ सोमवारी वाहतूकचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांच्या हस्ते त्यांच्या कार्यालयातून करण्यात आला. नागपूर शहरामधील प्रथमत: एकूण 20 हजार ऑटोरिक्षांना क्‍यूआर कोड स्टीकर्स लावण्यात येणार आहेत, हे विशेष. 

हेही वाचा - 'माया भाई' म्हणून मिरवायचा, विरोधकांना खटकायचे, त्यातूनच घडला हा प्रकार...
 

वाहतूक पोलिस या अभिनव अभियानात परवानाधारक ऑटोरिक्षांना क्‍यूआर कोड लावण्यात येणार आहे. त्याचा उपयोग ऑटोरिक्षामध्ये बसलेल्या प्रवाशांना होणार आहे. क्‍यूआर कोड स्कॅन केला असता, त्याद्वारे त्यांना ऑटोचालकाचे नाव, वाहन क्रमांक, फोटो अशी सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. 

संबंधित प्रवासी प्रवास करताना ही संपूर्ण माहिती त्याचे कुटुंबीय किंवा नातेवाइकांना व्हॉट्‌सऍप किंवा इतर मॅसेज प्रणालीदद्वारे पाठवू शकेल. तसेच चालकाची वागणूक, प्रवासाचा अनुभव शेअर करू शकतील. क्‍यूआर कोड लावण्यात आलेला ऑटोरिक्षा टॅग केला जाऊ शकतो. प्रवाशांना ज्या पदद्धतीने क्‍यूआर कोडचा फायदा होणार तसाच ऑटोचालकांना होणार आहे. त्यामुळे प्रवासी क्‍यूआर कोड लावलेल्या ऑटोनेच प्रवास करणे पसंत करतील. यावेळी वाहतूक विभागाच्या सर्व 10 झोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते. 
 

वाहतूक शाखा डिजिटल करण्याचा मानस 
वाहतूक शाखा पूर्णपणे डिजिटल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही ऑनलाइन लक्ष असावे. तसेच महिलांना अधिक सुरक्षिततेचे वातावरण निर्माण व्हावे, यावर भर दिला जात आहे. क्‍यूआर कोडमुळे ऑटोबाबत आणि चालकाची सर्व माहिती एकाच क्‍लिकवर मिळू शकेल. रात्री-बेरात्री प्रवास करणाऱ्या महिलांनासुद्धा आता सुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. 
विक्रम साळी, पोलिस उपायुक्‍त, वाहतूक शाखा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Autorickshaw QR code for women's safety