विजेचे बिल कमी येते म्हणून आनंदी होऊ नका; हा हर्ष अल्पकाळाचाच, कारण...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मे 2020

सर्वाधिक विजवापर असलेल्या महिन्यांतील वीज वापराची रिडिंगनुसार वसुली होणार असल्याने रेग्युलर बिलाचा आकडा चांगलाच फुगलेला दिसणार आहे. प्रसंगी ग्राहकांचा आक्रोशही सहन करावा लागू शकतो. या विषयावर अधिकाऱ्यांकडून कोणतेही विधान करणे तुर्त टाळले जात आहे. 

नागपूर : कोरोनाच्या संकटामुळे महावितरणने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मिटर रिडिंग व छापील बिल देणे बंद केले आहे. सध्या ग्राहकांना सरासरी वीजबिल एसएमएस स्वरुपात पाठविले जात आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या वीजवापराच्या तुलनेत बिल कमी असल्याने ग्राहक आनंदले आहे. पण, हा हर्ष अल्पकाळाचाच आहे. लॉकडाउननंतर रिडिंगनुसारच बिलाचा भरणा करावा लागणार आहे. उन्हाळ्यातील वीजवापर पावसाळ्यात रक्तदाब वाढविणारा ठरणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ग्राहकांना सरासरी बिल पाठविले जात आहे. त्यानुसार अनेकांना साधारणत: फेब्रुवारी महिन्यातील बिलाएवढेच एप्रिल व मे महिन्यातील बिल आले आहेत. पण, मोठ्या संख्येने ग्राहक बिलच भरत नसल्याचे चित्र आहे. परिणामी महावितरणची एप्रिल महिन्याची बिलापोटी होणारी वसुली केवळ 40 टक्केच राहिली.

जाणून घ्या - ज्याने जीवापाड जपले त्याच्याच जीवावर उठला हा वळू... वाचा ही करूण कहाणी

मे महिन्यात वसुली 25 टक्‍क्‍यांवर येण्याचा अंदाज आहे. वसुलीच कमी असल्याने आर्थिक ताळेबंद जुळविताना महावितरणला तारेवरची कसरत करावी लागत आहे. लॉकडाउननंतर ही कसर भरून काढली जाणार आहे. सर्वाधिक विजवापर असलेल्या महिन्यांतील वीज वापराची रिडिंगनुसार वसुली होणार असल्याने रेग्युलर बिलाचा आकडा चांगलाच फुगलेला दिसणार आहे. प्रसंगी ग्राहकांचा आक्रोशही सहन करावा लागू शकतो. या विषयावर अधिकाऱ्यांकडून कोणतेही विधान करणे तुर्त टाळले जात आहे. 

अधिक बिलाच्या तक्रारी

ग्राहकांना स्वत:हून ऍपद्वारे रिडिंग पाठविता येईल अशी तजविज आहे. परंतु, रिडिंग पाठवूनही त्याची दखल घेतली गेली नसल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. रिडिंग लोडच होत नाही, अशी तक्रार असणाऱ्या ग्राहकांचीही संख्या मोठी आहे. त्यातही मार्चमध्ये आलेल्या बिलापेक्षा एप्रिलचे बिल दुप्पट पाठविण्यात आल्याच्या तक्रारी सर्वाधिक आहेत. एप्रिलचे बिल भरण्याची मुदत 31 मेपर्यंत देण्यात आली. पण, मे महिन्यात आलेले बिल भरण्याची मुदत 16 जूनच आहे. म्हणजेच 15 दिवसांच्या अंतराने ग्राहकांना दोन बिलांचा भरणा करावा लागणार आहे.

असे का घडले? - तुम्हाला रडवेल ही बातमी... चाळीस दिवसांच्या बाळाला घेऊन ओल्या बाळंतीनीला करावा लागला सतराशे किमी प्रवास

रिडिंग, बिल वाटप सुरू करण्याची मागणी

फेब्रुवारीत 58 लाख, मार्चमध्ये 64 लाख ग्राहकांनी देयकाचा ऑनलाईन भरणा केला. एप्रिलमध्ये ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या ग्राहकांची संख्या केवळ 34 लाख नोंदविली गेली. ऑनलाईन बिल भरण्याचे प्रमाण कमी असल्याने रिडिंग व बिल वाटप तातडीने सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्‍ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The average electricity bill will be expensive