तुम्हाला रडवेल ही बातमी... चाळीस दिवसांच्या बाळाला घेऊन ओल्या बाळंतीनीला करावा लागला सतराशे किमीचा प्रवास

तुम्हाला रडवेल ही बातमी... चाळीस दिवसांच्या बाळाला घेऊन ओल्या बाळंतीनीला करावा लागला सतराशे किमीचा प्रवास

नागपूर : नाव दिलीपकुमार प्रजापती व चंदा प्रजापती... दोघे पती-पत्नी... दोघांना सहा व तीन वर्षांचे दोन मुले... तसेच एक बाळ फक्‍त चाळीस दिवसांचा... व्यवसायाने ते सुतार... मुळचे उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील रहिवासी... देशात लॉकडाउन व संचारबंदी घोषित झाल्यानंतर ओली बाळंतीन पती व दोन चिमुकल्यांसह दुचाकीवरून गावी निघाली. दुचाकीवरून ते 1,700 किमी अंतर कापणार आहेत. हा जीवघेणा प्रवास करताना नागपुरातील मदत केंद्रावर थांबल्यानंतर तिची अवस्था पाहून केंद्रातील सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का बसला... 

दिलीपकुमार आणि चंदा यांनी काही वर्षांपूर्वी हाताला काम मिळावे म्हणून आंध्रप्रदेशातील विजयवाडा शहर गाठले. तेथे एका कंत्राटदाराकडे सुतारकीचा व्यवसाय सुरू केला. दोघांचा सुखी संसार सुरू होता. त्याना जीवनात दोन फुले उमलली. गेल्या 21 मार्चला देशात लॉकडाउन आणि संचारबंदीची घोषणा झाली. त्यावेळी पत्नी चंदा ही साडेआठ महिन्यांची गर्भवती होती. अशा स्थितीत त्यांना उत्तरप्रदेशातील आपले घर गाठणे शक्‍य नव्हते. त्यामुळे त्यांनी विजयवाडा शहरातच थांबण्याचा निर्णय घेतला.

एप्रिल महिन्यात तिने गोंडस मुलीला जन्म दिला. लॉकडाउनमुळे हाताला काम नव्हते तर पदरचे पूर्ण पैसे पत्नीच्या बाळंतपणात खर्च झाले. आता त्यांच्यावर जगण्यासाठी संघर्ष सुरू होता. बाहेर काम करू देण्यास घरमालकानेही नकार दिला. त्यामुळे आता उपासमारीची वेळ प्रजापती दाम्पत्यावर आली. नाईलाजाने या दाम्पत्याने उत्तरप्रदेशातील गोरखपूरजवळच्या पादरी बाजार या आपल्या मूळगावी जाण्याचा निर्णय घेतला. 

बाहेर बस आणि रेल्वेही सुरू नसल्यामुळे तसेच खिशात पैसेही नसल्यामुळे चक्‍क बाईकवर गावाकडे जाण्याचे ठरवले. दोन लहान मुले, 40 दिवसांचे बाळ आणि ओली बाळंतीन असलेल्या पत्नीला सोबत घेऊन बाईकने पठ्ठा निघाला. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता बुटीबोरी ते नागपूरदरम्यान जामठा गावाजवळ असलेल्या दीनबंधू संस्थेच्या मदत केंद्रावर दाम्पत्य थांबले. त्यांच्या बाईकच्या अवतीभोवती पिशव्या बांधलेल्या होत्या. 

पोटात आग आणि गाव गाठण्याचे स्वप्न

भुकेमुळे व्याकुळ झालेल्या दोन्ही मुलांना घेऊन प्रजापती दाम्पत्य दिनबंधू मदत केंद्रावर आले. मदत केंद्रावरील कार्यकर्त्यांनी लगेच त्यांना थंड पाणी दिले. त्यानंतर लगेच मुलांना बिस्किट आणि ब्रेड दिले. दाम्पत्याला हात धुण्यास पाणी देऊन जेवण करण्यास सांगितले. हा सर्व प्रकार घडत असताना माय माऊलीच्या डोळ्यात पाणी होते.

चंदाचे डोळे डबडबले

फाटक्‍या कपड्यात गुंडाळेले अवघे चाळीस दिवस वय असलेल्या चिमुकलीकडे पाहून तेथील उपस्थित असलेल्यांचे मन हेलावले. मदत केंद्रावरील कार्यकर्त्यांनी जाताना दिलीपच्या हातात फळे, फराळ, बिस्किटे, ग्लुकोज आणि पाण्याची बॉटल असलेली पिशवी दिली. ओली बाळंतीन असलेल्या चंदाच्या हातात पैशाचे पाकिट ठेवले. पाकिटाकडे पाहताच चंदाचे डोळे डबडबले आणि तिला शब्दही सूचत नव्हते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com