esakal | गावावरून यायला ना वाहन, ना शहरात राहण्याची सोय; ऑफलाइन परीक्षा द्यायची कशी?
sakal

बोलून बातमी शोधा

B ed students face problem for offline exam due to covid in nagpur

शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये बी.एड. प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्चला सुरू झाली. पहिला पेपर होताच टाळेबंदीची घोषणा करण्यात आल्याने परीक्षा रद्द झाली. ही परीक्षा हिवाळी २०१९ ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे.

गावावरून यायला ना वाहन, ना शहरात राहण्याची सोय; ऑफलाइन परीक्षा द्यायची कशी?

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ९ नोव्हेंबरपासून बी.एड. प्रथम सत्राच्या ऑफलाईन परीक्षेचे आयोजन केले आहे. मात्र, कोरोनामुळे वसतिगृह बंद असल्याने बहुतांश विद्यार्थी घरीच आहेत. परीक्षेच्या ठिकाणी राहण्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना तीन दिवसांची परीक्षा देणे अडचणीचे ठरणार आहे. परिस्थिती सुरळीत झाल्यावरच परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. 

शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये बी.एड. प्रवेशप्रक्रियेला विलंब झाल्यामुळे हिवाळी २०१९ ची प्रथम सत्राची परीक्षा १६ मार्चला सुरू झाली. पहिला पेपर होताच टाळेबंदीची घोषणा करण्यात आल्याने परीक्षा रद्द झाली. ही परीक्षा हिवाळी २०१९ ची असल्याने विद्यापीठाला साथ प्रतिबंधक कायद्यानुसार या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात सरळ प्रवेश देणेही अशक्य आहे. त्यांचा प्रथम सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर करून त्या आधारे द्वितीय सत्रात पोहोचणाऱ्यांना तिसऱ्या सत्रात प्रमोट करता येणार आहे. या सर्व अडचणीमुळे बी.एड.प्रथम सत्रांत परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठामध्ये डॉ. वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून ९ ते ११ नोव्हेंबरदरम्यान परीक्षेचे आयोजन केले होते. १६ मार्च रोजी झालेला पेपर वगळून विद्यार्थ्यांना तीन दिवस परीक्षा द्यावी लागणार आहे. 

हेही वाचा - नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा...

नागपूर विद्यापीठातील बी.एड. विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे २ हजार ८०० आहे. यातील बहुतांश विद्यार्थी वसतिगृहात राहणारे असल्याने ते आता घरी आहेत. परीक्षेसाठी खोली करून राहणे अशक्य आहे. लिना तुलाबी नावाची विद्यार्थिनी कोरची येथील असून ती विद्यापीठाच्या महिला वसतिगृहात राहायची. मात्र, आता वसतिगृहच बंद असून तिचे नागपुरात नातेवाईकही नाहीत. त्यामुळे परीक्षेला कसे यावे, असा तिचा प्रश्न आहे. अनेक विद्यार्थी बाहेर राज्यातील असून त्यांना दिवाळीच्या तोंडावर प्रवासाची साधने मिळवण्यातही अडचण होत आहे. 

हेही वाचा - पुनर्वसनासाठी पूरग्रस्तांचा १४ वर्षांपासून वनवास, देवसरीमधील ९९ कुटुंबीय अद्यापही वाऱ्यावरच
 

बी.एड. विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंदर्भातील समस्यांची विद्यापीठाला जाणीव आहे. समितीच्या निर्णयानुसारच परीक्षेचे आयोजन केले होते. मात्र, विद्यार्थ्यांना फारच अडचण असल्याचे लक्षात आल्यास परीक्षा रद्द केली जाईल. 
-डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ.