नव्या पिढीला विदर्भातील लोकप्रिय भुलाबाईच्या उत्सवाचा पडलाय विसर?

famous bhualabai celebration in vidarbha
famous bhualabai celebration in vidarbha

नागपूर - आपल्या विदर्भात भुलाबाई बसविण्याची प्रथा आहे. आधी भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाई पाहुणी बनून प्रत्येक घरात येत होती. मात्र, काळाच्या ओघात आता हा उत्सव दसऱ्यापासून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंतच साजरा केला जातो. पण, तेही काही ठिकाणीच. अनेकांना भुलाबाईच्या उत्सवाची 'भूल' पडलेली पाहायला मिळते. विशेष म्हणजे हा मुलींचा उत्सव असून आता मुली हा उत्सव फारसा साजरा करताना दिसत नाही. त्यामुळे विदर्भातील ही लोकसंस्कृती लोप पावते की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.   

नवीन आलेल्या धान्याच्या स्वागतासाठी उत्सव -
महाराष्ट्रातील उर्वरीत भागात हा उत्सव भोंडला म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, विदर्भात या उत्सवाला भुलाबाई म्हणतात. महाराष्ट्रातील लोकजीवन, लोकसंस्कृती, कृषीसंस्कृती ही फार वैशिष्टय़पूर्ण आहे. महाराष्ट्राच्या विविध प्रांतात भौगोलिक विविधतेमुळे लोकसंस्कृती, कृषीसंस्कृती आणि लोकजीवन वैविध्यपूर्ण आहे. त्यातच विदर्भ, मराठवाडा, खान्देश, कोकण, पश्चिम महाराष्ट्र या सर्व विभागात वेगवेगळी लोकसंस्कृती पाहायला मिळते. याचप्रमाणे विदर्भात भाद्रपद पौर्णिमेपासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भुलाबाईचा उत्सव साजरा केला जातो. शेतमाल कापणीला आला की त्याचा आनंद शेतकरी या उत्सवाच्या माध्यमातून साजरा करत असतात. खरिपाची पेरणी झाल्यावर दसरा, दिवाळीपर्यंत पीक हे पूर्णपणे काढणीला येतं आणि कष्टाने पिकवलेल्या या कृषीलक्ष्मीच्या आगमनाने शेतकरी आनंदलेला असतो. या नवीन आलेल्या धान्याच्या स्वागतासाठी भूलाबाईचा उत्सव साजरा केला जातो.

खिरापत ओळखण्याची स्पर्धा -
विदर्भात कोजागिरी ही माळी पैर्णिमा म्हणून साजरी केली जाते. भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण. एक महिन्यासाठी ती आपल्या माहेरी येते. तिचा हा सण, भुलाबाईसोबत भुलोजी आणि गणेश यांची महिनाभर लहान मुली घरोघरी स्थापना करतात. माहेरवाशीण भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा सांब असलेला शंकर आणि लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती. भुलाबाईचा हा उत्सव विदर्भात पारंपरिक बालमहोत्सव म्हणूनही ख्यातीप्राप्त आहे. माळी पौर्णिमेपर्यंत (कोजागरी पौर्णिमा) शेतांमध्ये ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन ही पिके काढणीला आलेली असतात. या नव्या धान्याचं स्वागत म्हणजे भुलाबाईचा उत्सव. महिनाभर रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सगळ्या मुली एकत्र गोळा होऊन एकीमेकींच्या घरोघरी जाऊन भुलाबाईची गाणी म्हणतात. त्यानंतर खाऊ दिला जातो, त्याला खिरापत असे म्हणतात. त्यामध्ये दररोज नवा खाऊ असून तो बंद डब्यात असतो. ही खिरापत मुलींना ओळखायची असते. 

ज्वारीच्या धांड्याचा निवारा -
विदर्भासोबतच आजूबाजूच्या काही भागात हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये खान्देश, मराठवाड्याचा काही भाग तसेच मध्यप्रदेशच्या काही भागात भुलाबाईचा उत्सव साजरा होताना पाहायला मिळतो. जवळपास एक महिन्यानंतर भुलाबाईचा उत्सव संपतो. कोजागिरी म्हणजे माळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भुलाबाईंच विसर्जन केले जाते. कोजागिरीच्या सायंकाळी भुलाबाईचा मोठा उत्सव भरतो. त्यामध्ये परिसरातील सर्व मुली, महिला एकत्र येतात. भुलाबाई अन् भुलोबासाठी ज्वारीच्या भरलेल्या कणसांसह ज्वारीच्या धांड्यांचा निवारा तयार केला जातो. त्यामध्ये भुलाबाई अन् भुलोबाला ठेवून पूजा केली जाते. या निवाऱ्याला माळी म्हणतात. 

भुलाबाईंच्या गाण्यातून रेखाटलेले लोकजीवन -
२१ व्या दशकात अनेक मुलींना भुलाबाईची गाणी म्हणायला सांगितली, तरी येणार नाही. भुलाबाईच्या गाण्यांमधून लोकजीवन रेखाटलेलं जाणवतं. पूर्वीच्या काळी असणारं सासरपण आणि माहेरपण हे भुलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होतं. भुलाबाईची गाणी ही मनोरंजन म्हणून नव्हे तर ती अर्थपूर्ण लोकशिक्षण देणारं साहित्य आहे. पूर्वीच्या काळी सून म्हणून असणाऱ्या अतिरेकी जबाबदाऱ्या सांभाळताना सुनेची होणारी दमछाक भुलाबाईच्या गाण्यातून व्यक्त होते. त्यामुळेच ती माहेरी एक महिन्यासाठी येते. कारण माहेरच्या माणसांची आपुलकी, प्रेम, स्नेह, ओलावा तिला सासरी मिळत नाही. म्हणूनच माहेरपणासाठी भुलाबाई एक महिना घरोघरी येतात. सासरी गेलेली किंवा जाणारी आपली मुलगी जणू भुलाबाईच आहे, या भावनेतून सासरी जाणाऱ्या मुलींना सासरचं सासरपण या भुलाबाईच्या गाण्यांतून कळतं, तर भुलाबाई या आपली सखी आहे. मात्र, आता भुलाबाईच्या उत्सवात पूर्वीसारखी रंगत राहिलेली नाही. पण आपली ही लोकसंस्कृती जपायला पाहिजे. आपल्या नवीन पिढीला आपल्या लोकसंस्कृतीचा वारसा, त्याची ओळख देण्यासाठी तरी आपण हा उत्सव साजरा करणे गरजेचे आहे. 

भुलाबाईची गाणी - 

आडकीत जाऊ खिडकीत जाऊ
खिडकीत होती सुई
भुलाबाईला लेक झाली
नाव ठेवा जुई...
आडकीत जाऊ खिडकीत जाऊ

खिडकीत होता बत्ता...
भुलोजीला मुलगा झाला
नाव ठेवा दत्ता...

पहिली गं पुजाबाई
पहिली गं पुजाबाई
देवा देवा सादेवा
घातीला मंडोबा
खेळी खेळी खंडोबा
खंडोबाच्या नारी बाई...

पहिली गं पुजाबाई
गवर बसली न्हायाला
शंकर आले पाह्यला
शंकर आमचे जावई
शालमुंदी करावी
करावीचे दोरे
भुलोजी आमचे गोरे
गोऱ्या पायी घागऱ्या
घागऱ्या आमच्या सोन्याच्या
पहिला आसू मोत्याचा
भुलोजी आमचा नात्याचा

झामक-झुमक
झामक-झुमक
बाजारा गेली
घरची गहुली
पाण्या नेली
पाणी काढता फुटला चुळा
सासूनं मारला टुचकन टोला
त्या बाई टोल्याची गाळली आसू...

काळात ओघात उत्सव संपुष्टात -
भुलाबाई आणि भुलोजींच्या समोर विविध धान्याची आरास करून त्या धान्याची पूजा करून केली जाते. भुलाबाई आणि भुलोजी यांच्या मातीच्या मूर्ती या लहान मुली-महिला स्वत: हाताने तयार करतात. त्यासोबत पाच मातीच्या माळ्या (मातीचे दिवे) बनवतात. शेवटच्या दिवशी म्हणजे कोजागिरीला मुलींना एका महिन्याचा खाऊ म्हणजे ३१ दिवसांचा खाऊ (खिरापत) एकाच दिवशी मिळतो. शेवटच्या दिवशी भुलाबाईंना ३२ प्रकारच्या खिरापतींचा (खाऊंचा) नैवेद्य दिला जातो. त्यामुळे लहान मुलींना, महिलांना आणि सगळ्यांनाच या दिवशी खाऊंची खिरापतीची मोठीच मेजवानी मिळते. मात्र, काळ बदलत गेला अन् भुलाबाईचा उत्सवाची रंगत देखील संपुष्टात यायला लागली. आता काही ठिकाणी फक्त दसऱ्यापासून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो, तर काही ठिकाणी मुलींना हा उत्सव माहिती देखील नाही. त्यामुळे विदर्भाची लोकसंस्कृती लोप तर पावत चालली नाही ना? अशी भीती व्यक्त केली जाते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com