
शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून रजेगाव येथे बाघ इटियाडोह विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासाची सोय व्हावी, म्हणून चार इमारती बांधल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी या इमारतींची देखभाल संबंधित विभागाकडून केली जात होती.
रावणवाडी (जि. गोंदिया) : रजेगाव येथील बाघ इटियाडोहच्या इमारतींच्या देखरेखीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. परिणामी, या इमारती मोडकळीस आल्या असून, असामाजिक तत्त्वांचा अधिक वावर वाढला आहे. परिणामी, परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हेही वाचा -"ओ मामी, बजेटवर एक रॅप साॅंग लवकर घेऊन या";...
शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून रजेगाव येथे बाघ इटियाडोह विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवासाची सोय व्हावी, म्हणून चार इमारती बांधल्या आहेत. पाच वर्षांपूर्वी या इमारतींची देखभाल संबंधित विभागाकडून केली जात होती. परंतु, सद्यःस्थितीत इमारतींच्या देखभाल, दुरुस्तीकडे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. इमारतींचे दरवाजे तुटले आहेत. छत उखडून पडले आहेत. परिणामी, या इमारतींवर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केला आहे. दारूसह, तासपत्त्यांचा अड्डा बनला आहे.
अमली पदार्थांचे सेवनही केले जात आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या इमारतींमध्ये सरपटणाऱ्या जीवजंतूंचाही वावर आहे. असे असले तरी, संबंधित विभागाचे इमारतींच्या देखभाल, दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. दरम्यान, प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन इमारतींची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
नक्की वाचा - घुंघट आणि समाजाचे पाश तोडून 'त्या' क्रिकेट...
विद्यार्थ्यांनीदेखील बनवला अड्डा
या एकट्या पडलेल्या इमारतींमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीदेखील आपला जम बसविला आहे. सिगारेटसह अन्य नशाही त्यांच्याकडून केल्या जात असल्याची माहिती आहे. उल्लेखनीय म्हणजे, एका इमारतीत बाघ इटियाडोहचे कार्यालय आहे. या कार्यालयातील कर्मचारी कधी येतील, अन् कधी निघून जातील, याचा नेम नाही
संपादन - अथर्व महांकाळ