
निष्ठावंतांचे डिमोशन आणि आयारामांना प्रमोशन दिल्याने निष्ठावंत शिवसैनिक सध्या चांगलेच नाराज आहेत. अनेकांनी कार्यकारणीच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी स्वीकारण्यास नम्र नकार दिला आहे.
नागपूर : शहराचे संपर्क प्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यकारिणीवर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे पाच विधानसभा मतदारसंघात समांतर कार्यक्रम घेऊन विद्यमान नेत्याच्या विरुद्ध धनुष्यबाण हाती घेतले आहे. बाळासाहेबांच्या जयंती कायक्रमांना सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे, सतीश हरडे आणि बंडू तागडे यांनी केले आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ जानेवारीला नागपूरला येत आहेत. आपला आवाज बुलंद करून त्यांच्यासमोर आपली नाराजी शिवसैनिक दर्शवणार असल्याचे समजते.
हेही वाचा - भाजपमध्ये लवकरच फाटाफूट! ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांचा पक्षाला राम-राम करण्याचा...
निष्ठावंतांचे डिमोशन आणि आयारामांना प्रमोशन दिल्याने निष्ठावंत शिवसैनिक सध्या चांगलेच नाराज आहेत. अनेकांनी कार्यकारणीच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी स्वीकारण्यास नम्र नकार दिला आहे. अलीकडेच पूर्व विदर्भाचे निरीक्षक नागपूरला आले होते. तेव्हा नाराज शिवसैनिकांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांनी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर काहीच झाले नाही. त्यामुळे आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी नाराज शिवसैनिकांनी स्वतंत्रपणे कार्यक्रमाची आखणी सुरू केली आहे. बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून त्याचा श्री गणेशा करण्यात आला. यासाठी दोन माजी जिल्हा प्रमुख एकत्र आले आहेत.
हेही वाचा - वय अडीच वर्ष अन् 'इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद, गुण ऐकूण तुम्हीही व्हाल थक्क
शनिवारी पूर्व नागपुरातील आयनॉक्सजवळ सकाळी साडेआठ वाजता, साडेनऊ वाजता दक्षिण नागपुरातील रुक्मिणी नगर सुभेदार ले-आउट, अकरा वाजता दक्षिण-पश्चिम नागपूरमधील झाशी राणी चौकातील गुरुकुल अकादमी, दुपारी बारा वाजता गांधी पुतळा चितारओळ आणि चार वाजता उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती चौकात बाळासाहेबांच्या जयंतीचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
हेही वाचा -
मुत्तेमवार आणि विकास ठाकरे यांच्याशी मतभेद असल्याने माजी मंत्री सतीश चतुर्वेदी काँग्रेसमध्ये असताना असेच समांतर कार्यक्रम घेण्यात येत होते. त्यानंतर त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. आता शिवसेनेमध्येही समांतर कार्यक्रमाची शृखंला सुरू होऊ घातली आहे. त्यावेळी सतीश चतुर्वेदी विरोधात होते. यावेळी त्यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विरोधात शिवसैनिक आहेत.