पदवीधर निवडणुकीत घरोघरी जाऊन मागावी लागणार मते 

नीलेश डोये
Friday, 6 November 2020

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यासाठी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने मतदारांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात तक्रार करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागस्तरीय अंमलबजावणी कक्ष कार्यान्वित करण्यात आला. 

नागपूर  : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा शंखनाद झाला आहे. परंतु, यंदा उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारसभा घेण्यास प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे उमेदवार व त्यांच्या समर्थकांना मते मागण्यासाठी प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधावा लागणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तसेच विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले की, केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यासाठी आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीच्या अनुषंगाने मतदारांना येणाऱ्या अडचणीसंदर्भात तक्रार करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागस्तरीय अंमलबजावणी कक्ष कार्यान्वित करण्यात आला. 

ठळक बातमी - धमक्या मिळतात, पण मी जीवाला भीत नाही; शेवटपर्यंत ओबीसींसाठीच लढणार - वडेट्टीवार 
 

सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणेचे आचारसंहितेचे कोणत्याही व्यक्ती वा गटाकडून त्याचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेतली जावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने प्रचारसभा घेण्यास प्रतिबंध घातला आहे. घोषित निवडणूक कार्यक्रमानुसार आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या कक्षामार्फत कामकाज होणार आहे. 

त्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व उपायुक्त मिलिंद साळवे यांची नियुक्ती करण्यात आली असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मतदारांची कुठलीही तक्रार असल्यास मतदारसंघातील मतदारांना विभागस्तरावरील तक्रार निवारण कक्षाकडे करता येणार आहे. तक्रारदारांनी आपली तक्रार विभागीय आयुक्त कार्यालय, नागपूर येथे 0712-2542518 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी केले आहे. 

संपादन  : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ban on campaign rallies in graduate elections