रुग्णांची ससेहोलपट : बाकावरच सहन करतात वेदना; त्यांना हवा उपचार नाही तर मृत्यू

केवल जीवनतारे
Monday, 14 September 2020

खाट मिळत नसल्यामुळे या परिसरात लावलेल्या बाकावरच रुग्ण उपचाराविना वेदना सहन करीत असल्याचे चित्र येथे दिसत आहे. यामुळे मेडिकल, मेयो आता गरिबांसाठी राहिलेच नाही, अशी खंत व्यक्त करीत व्हीआयपींसाठी खाटा आरक्षित ठेवण्यात येत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

नागपूर : ज्यांचे कोणी नाही, त्यांचे मेडिकल-मेयो आहे, असा समज शहरातीलच नव्हे तर विदर्भातील सामान्य जनतेचा आहे. यामुळेच दरवर्षी मेयोत सहा तर मेडिकलमध्ये सात लाख रुग्णांची नोंदणी होते. परंतु, कोरोना विषाणूची दहशत परसली आली मेयो, मेडिकलमध्ये रुग्णांचा खाटांसाठी टाहो सुरू झाला. खाट मिळत नसल्यामुळे परिसरात लावलेल्या बाकावरच रुग्ण उपचाराविना वेदना सहन करीत असल्याचे चित्र येथे दिसत आहे.

दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडाच नव्हे तर मृत्यूचा आकडादेखील फुगत चालला आहे. दर दिवसाला चाळीसपेक्षा अधिक मृत्यू होत आहेत. यंत्रणेवरही प्रचंड ताण आहे. परंतु, रुग्णालाही हक्क आहेत. उपचार व्हावे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, नागपुरातील मेयो, मेडिकलमध्ये रुग्णांचा खाटांसाठी टाहो सुरू आहे.

खाट मिळत नसल्यामुळे या परिसरात लावलेल्या बाकावरच रुग्ण उपचाराविना वेदना सहन करीत असल्याचे चित्र येथे दिसत आहे. यामुळे मेडिकल, मेयो आता गरिबांसाठी राहिलेच नाही, अशी खंत व्यक्त करीत व्हीआयपींसाठी खाटा आरक्षित ठेवण्यात येत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

हेही वाचा - अरे हे काय... सोन्याचे भाव घटले, तरीही ग्राहक फिरकेना, या महिन्यात दरवाढ होण्याचे संकेत

शहरात कोरोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. त्या तुलनेत उपचार यंत्रणा पार कोलमडून गेली आहे. मेयो, मेडिकलच्या डॉक्टरांवर प्रचंड ताण आला आहे. त्यात खाटांची संख्या अपुरी असल्यामुळे खाटा मिळत नाही. नुकतेच कुही व सावनेर तालुक्यातील आलेल्या रुग्णांना रविवारी मेयोमध्ये भरती होण्यासाठी दिवसभर हेलपाटे सहन करावे लागले.

‘साडवा’ भागातून आलेल्या रुग्णाला सकाळी दहा वाजतापासून मेडिकल, मेयोसह एका खासगी रुग्णालयात खेटा मारत आहेत. प्रशासनाशी संपर्क साधला असता उपलब्ध असलेल्या खाटा रुग्णांसाठीच आहेत. तर व्हीआयपींसाठी खाटा ठेवण्याचा नियम आहे. यामुळे नातेवाइकांनी केलेल्या या आरोपात तथ्य नाही.

मेडिकलमधून मेयोत रेफर

मेडिकलमधील तांत्रिक अडचणीमुळे रुग्णांच्या हातातील केसपेपरवर ‘रेफर टू मेयो’त असे लिहून देण्यात येत आहे. मेयोत पोहोचल्यानंतर अक्ष्ररश: गंभीर रुग्णांची ससेहोलपट झाली. मेयोमध्ये आधीच १२ रुग्ण भरती होण्याच्या वेटिंगवर आहेत, असे त्यांना सांगण्यात आले. न्यूमोनियाच्या रुग्णालादेखील या दोन्ही शासकीय रुग्णालयांनी भरती न करता खाटा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून मरणाच्या दारात सोडून दिल्याचे विदारक दृश्य मेयो रुग्णालयासमोर एका बाकावर बसलेल्या रुग्णाकडून कळले.

अधिक माहितीसाठी - काही सेकंदात ओळखा तुमच्या अन्नातील भेसळ; हे उपाय करून बघाच

मेयोतील डॉक्टर रात्रंदिवस सेवा देत आहेत
मेयो रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार होत आहेत. एकाही रुग्णाला वाऱ्यावर सोडण्यात येत नाही. रुग्णांची प्रचंड गर्दी असल्यामुळे काही वेळ प्रतीक्षा करावी लागत असेल; परंतु प्रत्येक रुग्णाला उपचार देण्यासाठी मेयोतील डॉक्टर रात्रंदिवस सेवा देत आहेत. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्यासह सारेच वरिष्ठ डॉक्टर नित्यनियमाने रुग्णसेवेचा धर्म पाळत आहेत. नातेवाइकांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यास यावर उपाय शोधता येतील.
- डॉ. रवी चव्हाण,
वैद्यकीय अधीक्षक, मेयो रुग्णालय, नागपूर

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bed waiting for patients in Mayo and Medical