बालविवाह झालेल्या वृद्ध दाम्पत्याचा पुनर्विवाह; मोठा मुलगा वडिलांचा, तर लहान मुलगा आईचा पालक

बबलू जाधव
Monday, 16 November 2020

वडिलांचे पालक म्हणून मोठा मुलगा पुंडलिक हिवराळे झाले तर लहान मुलगा पंडित हिवराळे हा आईचा पालक झाला आहे. या विवाह सोहळ्याच्या लग्नपञिका सुध्दा छापल्या आहेत. सदर लग्नपञिका कुटुंबीयांना देण्यात आल्या आहेत. या सोहळ्यात मुलगा, मुलगी, सुना, जावई व नातवंड सहभागी होणार आहेत.

आर्णी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील लोणी येथील सीताराम उंद्राजी हिवराळे यांचा खंडाळा येथील निर्मला सूर्यभान इंगोले यांच्यासोबत १६ नोव्हेंबर १९५५ साली विवाह झाला होता. त्यावेळी सीताराम यांचे वय बारा वर्ष तर निर्मला यांचे वय अवघे सात वर्षे होते. बालपणी झालेल्या विवाहाची आठवण दाम्पत्याला नाही. त्यामुळे मुलांनीच आई-वडिलांचा पुन्हा विवाह सोहळा आयोजित केला आहे. हा सोहळा सोमवारी होणार आहे.

हिवराळे दाम्पत्याला तीन मुले आहेत. मोठी मुलगी तुळजा मधुकर जोगदंड (रा. सायखेडा, ता. दारव्हा), दुसरा मुलगा पुंडलिक तर तिसरा मुलगा पंडित आहे. मोठा मुलगा पूंडलिक हिवराळे हा शेतकरी आहे.

क्लिक करा - अखेरचाच ठरला ‘भूषण’चा वाढदिवस; आज शासकीय इतमामात अंतिम संस्कार

लहान मूलगा पंडित हिवराळे हा ग्रामसेवक आहे. वडील सीताराम हिवराळे (वय ८५) आणि आई निर्मला (वय ७२) यांचा विवाह बालपणी झाल्याने त्यांना त्याविषयी आठवत नाही. त्यामुळे मुलांनी आपल्या आई-वडिलांचा विवाह तब्बल ६५ वर्षांनंतर पुन्हा एकदा करण्याचे निश्‍चित केले आहे.

बालवयात झालेल्या लग्नाचा आनंद कसा असतो यांची आठवण सुध्दा राहिली नसल्याने आई-वडिलांचा ६५ वा लग्नवाढदिवस सोमवारी (ता. १६) राधाकृष्णनगरी येथे पूर्वविवाह सोहळ्यांनी संपन्न होणार आहे.

वडिलांचे पालक म्हणून मोठा मुलगा पुंडलिक हिवराळे झाले तर लहान मुलगा पंडित हिवराळे हा आईचा पालक झाला आहे. या विवाह सोहळ्याच्या लग्नपञिका सुध्दा छापल्या आहेत. सदर लग्नपञिका कुटुंबीयांना देण्यात आल्या आहेत. या सोहळ्यात मुलगा, मुलगी, सुना, जावई व नातवंड सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - जेवण बेतले जीवावर; शहराबाहेर जेवण करण्यास गेलेल्या युवकांचा जागीच मृत्यू

आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा
आई-वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. देवपूजा करण्यापेक्षा आई-वडिलांच्या सेवेतच खरा आनंद आहे. आमच्या आई-वडिलांचे बालवयात लग्न झाले. त्याची आठवणही त्यांना नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या विवाहाच्या आनंदाचा क्षण बघता यावा यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. कुटुंबीयांच्या उपस्थितीत रितीरिवाजाप्रमाणे लग्न सोहळा पार पडणार आहे.
- पंडित सीताराम हिवराळे, मुलगा

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remarriage of an elderly couple with child marriage