कॉंग्रेसमध्ये नवचैतन्य, भाजपला चिंता, इतर पक्षांनाही आस 

मनोहर घोळसे
शनिवार, 28 डिसेंबर 2019

रणांगणातील उमेदवार आपापले भाग्य आजमावत आहे. यात असलेल्या काही अपक्ष उमेदवारांमुळे आपले गणित बिघडू नये, यासाठी त्यांची मनधरणी सुरू असल्याने काहींची माघार घेण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सावनेर (जि. नागपूर) :  जिल्हा परिषदेच्या रणधुमाळीने जोर पकडल्याने गावोगावी राजरंग चढलाय नवख्यांच्या एन्ट्रीमुळे व पक्षांतरामुळे भाजपची चिंता वाढली आहे. मात्र आमदार सुनील केदार यांना भरघोस मतांनी मिळालेला विजय व बहुतांश ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचा असलेला झेंडा यामुळे कॉंग्रेस उमेदवारांमध्ये उत्साह संचारला आहे. 

तालुक्‍यातील जिल्हा परिषदेसाठी केळवद, वाकोडी ,बडेगाव, पाटणसावंगी, वलनी व चिचोली अशा सहा गटात तर याअंतर्गत पंचायत समितीसाठी केळवद, नांदा ,वाकोडी, वाघोडा, बडेगाव, खुबाळा, पाटणसावंगी, पिपळा, वलनी, सिल्लेवाडा, चिचोली, चणकापूर आदी बारा गणांसाठी रणांगणातील उमेदवार आपापले भाग्य आजमावत आहे. यात असलेल्या काही अपक्ष उमेदवारांमुळे आपले गणित बिघडू नये, यासाठी त्यांची मनधरणी सुरू असल्याने काहींची माघार घेण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. केळवद सर्कलमध्ये हायप्रोफाईल लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. येथून भाजपने गिरीश मोवाडे तर कॉंग्रेसने मनोहर कुंभारे यांना उमेदवारी दिली आहे. 

अधिक वाचा : ताई, बाई, आक्का, उमेदवार विचार करा पक्का 

भाजप-कॉंग्रेस आमने सामने 

बडेगाव गटामध्ये चार उमेदवार रिंगणात असून कॉंग्रेसच्या छाया बनसिंगे व भाजपच्या क्रांती देशमुख यांच्यात सरळ लढत होणार आहे. वाकोडीमधून चार उमेदवार रिंगणात असून भाजप व कॉंग्रेस आमने सामने आहेत. कॉंग्रेसतर्फे ज्योती कॉंग्रेसतर्फे ज्योती शिरसकर तर भाजपतर्फे माधुरी मदनकर यांच्यात सरळ लढतीचे चित्र आहे. पाटणसांगीमध्ये अशीच स्थिती आहे याठिकाणी भाजपच्या अनिता परतेकी व कॉंग्रेसच्या मुक्ता कोकड्डे यांच्यात सरळ लढत आहे. वलनीमध्ये दहापैकी सहा उमेदवार अपक्ष आहेत. यातील काही माघार घेतील. भाजपने अरुण सिंग तर कॉंग्रेसने प्रकाश खापरे व राकॉंने किशोर चौधरी यांना उमेदवारी दिली आहे. चिचोली गटासाठी भारिप-बहुजन महासंघाच्या रंजना उइके, भाजपच्या कांता परतेकी, कॉंग्रेसच्या नीलिमा उईके यांच्यात लढत होणार आहे. 

हेही वाचा : सांगा पाहू,  रस्त्यावर डांबर आहे  कि चिखल 

केळवदवर सर्वांचे लक्ष

केळवद जिल्हा परिषद सर्कल हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे. ओबीसी राखीव असलेल्या या गटातून भाजपने विवेक जिवतोडे व दिनेश कुबिटकर यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी पक्षांतर केले आहे. जीवतोडे यांनी रा.स.प आणि कुबिटकर यांनी शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळविली. भाजपचे गिरीश (अजय) मोवाडे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे गड कायम राखण्यासाठी कॉंग्रेसने केदार यांचे खंदे समर्थक व जिल्हा परिषदेतील दबंग नेते मनोहर कुंभारे यांना उमेदवारी देत केळवदमध्ये चांगलीच रंगत निर्माण केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP-Congress meet in Sawner