सांगा पाहू, ,रस्त्यावर डांबर आहे की चिखल ? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 डिसेंबर 2019

परवानगी देताना मुरूम कुठल्या वाहनाने न्यायचा याकडे परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याने लक्ष दिले नसून लोकांची व रस्त्याची हानी होऊन मुरूम काढणाऱ्या कंपनीला नफा होईल, याकडेच लक्ष दिले की काय,असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

काचुरवाही (जि.नागपूर)  : रामटेक मार्गाचे बांधकाम गेल्या कित्येक दिवसापासून मंजूर झाले. मंजूर होताच गावकऱ्यांचा उत्साह गगनात मावेनासा झाला. परंतु, लगेच सरकारी कामाची (दु)र्गती लक्षात आल्यावर ग्रामस्थांची निराशा झाली. अजूनपर्यंत या रस्त्याचा बांधकामाचा ठावठिकाणी नाही, म्हणून या रस्त्यावरच चिखलाचे डांबर व होणारा त्रास पाहून तळपायाची आग थेट मस्तकात गेल्याशिवाय राहात नाही. 

रस्त्याची उंची वाढता वाढेना ! 

अधिक वाचा - आला "हिवसाळा', स्वेटकर, जॉकेटसह रेनकोट घाला 

बरं, रस्त्याचे उद्‌घाटन करून सगळे मोकळे झाले. काचुरवाही ते रामटेक रस्ता मंजूर होऊन फक्त एका टप्प्यातील कामाला सुरुवात झाली. हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून रस्त्याचा रुंदीची मागणी करूनदेखील बनणारा रस्ता हा आहे, त्या रुंदीचाच तयार होत आहे. मुरूम वाहणारी अवजड वाहने रस्त्याची स्थिती अतिशय खराब करून ठेवतात. सध्या पाऊस सुरू असून या मार्गावरून चालणे म्हणजे जणू सर्कसच आहे. एकीकडे रस्त्यावरील वाहने वाढली. वाहतूक वाढली. पण, रस्त्याची रुंदी वाढेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे मनसर-तिरोडा महामार्गाचे काम सुरू असून या महामार्गाचा कामासाठी मुरमाची आवश्‍यकता असताना रामटेक काचुरवाही मार्गालगत असलेल्या जमिनीतील मुरूम उत्खनन करण्याची परवानगी संबंधित उपविभागीय तहसील कार्यालयाकडून देण्यात आली. परंतु, परवानगी देताना मुरूम कुठल्या वाहनाने न्यायचा याकडे परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याने लक्ष दिले नसून लोकांची व रस्त्याची हानी होऊन मुरूम काढणाऱ्या कंपनीला नफा होईल, याकडेच लक्ष दिले की काय,असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

अधिक वाचा - तुम्ही बेरोजगार आहात, सावध रहा?

दुचाकीवरून घसरून पळण्याची वेळ 
रस्त्याची क्षमता नसताना अवजड वाहनांनी वाहतूक करण्यात येत असल्यामुळे रस्त्याचे "बारा' वाजले. सोबतच या अवजड ट्रकसारख्या जड वाहनाने रस्त्याची दुरवस्था तर झालीच रस्तेही उखडले. जागोजागी खड्‌डे निर्माण झालेल्या जागी मुरूम टाकून उत्खनन करणारे मोकळे झाले. अशातच रस्त्यावर मुरूम टाकलेल्या ठिकाणी बुधवार, गुरुवारच्या मध्यरात्री आलेल्या पावसाने मुरूम टाकलेल्या भागात अतिशय चिखल झाल्याने या ठिकाणी नागरिक दुचाकीवरून घसरून पडू लागले. काहींना जाणे आणि येणेही शक्‍य नसल्याचे नागरिक सांगतात. संबंधित विभागाने विशेष लक्ष पुरवून रस्त्याची दुरवस्था तत्काळ दूर करावी, अशी मागणी गावातील ग्रामस्थ करू लागले आहेत. अशा अवजड वाहतुकीद्वारे उत्खनन केलेला मुरूम स्थलांतरित करण्याचा परवाना देऊ नये आणि मुरूम काढण्याचीही परवानगी देऊ नये. परवाना देताना उत्खनन ठिकाणी शासकीय कर्मचारी ठेवावा, जेणेकरून एका रॉयल्टीवर एकापेक्षा जास्त गाड्या मुरूम काढता येणार नाही, याकडेही लक्ष देण्यात यावे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Is there a tarp or mud on the road?