"ठाकरे सरकारची वर्षपूर्ती म्हणजे विदर्भातील जनतेसाठी काळा दिवस"; बावनकुळेंची खोचक टीका 

राजेश चरपे 
Friday, 27 November 2020

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती हा विदर्भातील जनतेसाठी काळा दिवस असून मागील एक वर्षाच्या काळात या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी कोणताही निर्णय घेतला नाही.

नागपूर ः राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी दिलेला चार हजार कोटींचा निधी सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे परत गेला, असा आरोप माजी ऊर्जा मंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती हा विदर्भातील जनतेसाठी काळा दिवस असून मागील एक वर्षाच्या काळात या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. केवळ श्रेयवादाच्या लढाईमुळे सर्व विकास कामे ठप्प पडली असून या कामांसाठी निधीही उपलब्ध करून दिला नाही, असे सांगत बावनकुळे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीला निधी मिळालेला नाही. 

सविस्तर वाचा - व्हॉट्‌सॲपमुळे पसरली प्रेमसंबंधाची माहिती; बदनामीच्या भीतीने तरुणीची आत्महत्या

मुख्यमंत्री मुंबईचे, उपमुख्यमंत्री पुण्याचे आणि मंत्री आपापल्या मतदारसंघाचे असा कारभार सध्याच्या सरकारचा सुरू आहे. काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षाच्या सरकारमध्ये श्रेय घेण्याच्या चढाओढीत विदर्भातील विकास कामे आणि योजना फसल्या आहेत. त्यामुळे विदर्भावर अन्याय केला जात आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारे अधिवेशनही या सरकारने पळविले. 

यंदा पावसामुळे सोयाबीन, तूर,कापूस, धान आणि फळ भाज्यांचे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. पण सरकारने फक्त शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पूरग्रस्त भागातील नागरिक आजही शाळा आणि अंगणवाड्यांमध्येच राहत आहेत, त्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविला गेला नाही. पाच कोटी वीज ग्राहकांच्या वीज बिलाचा प्रश्न या सरकारला सोडविता आलेल नाही. ऊर्जा मंत्र्यांनी दिलेले आश्वासन त्यांच्या पक्षाचे मंत्री आणि सरकारमधील मंत्री खोडून काढतात, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

अधिक वाचा - आता धावत्या मेट्रोत साजरा करा समारंभ; अवघ्या तीन हजार रुपयांत होणार ‘ग्रॅन्ड सेलिब्रेशन

गोरगरीब,निराधारांसाठी असलेली संजय गांधी योजना व अन्य योजनांच्या समित्यांचे गठन झालेले नाही. परिणामी लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. रेशन कार्ड आहे पण आरसीआयडी नंबर मिळत नाही. रस्ते, वीज, पाणी यांचा बॅकलॉग वाढत आहे. विदर्भातील जनतेच्या दु:खावर मीठ चोळले जात असून सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले हे सरकार असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp leader chandra shekhar bawankule criticized Maharashtra government