हमिद अन्सारींचे वक्तव्य अशोभनीय; सकाळी उठून हिंदूत्व ओरडणाऱ्यांनी उत्तर द्यावे, मुनगंटीवारांचा सेनेला टोला

संजय डाफ
Saturday, 21 November 2020

आमचे हिंदूत्व सर्वसमावेशक आहे. सहिष्णुता आमच्या रक्तात आहे. मानवतेचा धर्म म्हणजे हिंदूत्व आहे. मात्र, आतंकी भावनेनी कोणी या देशाचे नुकसान करत असेल तर मग 'जय भवानी-जय शिवाजी', असेही मुनगंटीवार म्हणाले.

नागपूर : हमिद अन्सारी यांनी हिंदूत्ववाद लक्षान घेऊन भाष्य करणे गरजेचे होते. त्यांनी उपराष्ट्रपतीपद भूषविले आहे. त्यामुळे असे वक्तव्य करणे त्यांच्या त्या पदाला शोभा देत नाही. आता हिंदूत्ववाद कोरोनापेक्षा वाईट आहे, की असा कट्टरवाद कोरोनापेक्षा वाईट आहे, हे जनता ठरवेल. मात्र, रोज सकाळी उठून आमच्या रक्तामध्ये हिंदूत्व आहे म्हणणाऱ्यांनी याचे उत्तर द्यायला पाहिजे, असे म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला. आज पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांच्या प्रचारासाठी ते नागपुरात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

हमिद अन्सारी यांनी उपराष्ट्रपती हे मोठे पद भूषविले आहे. त्यांच्याऐवजी कोणी असे वक्तव्य केले असते, तर त्यांना तसे उत्तर देता आले असते. मात्र, त्यांच्या पदाचा मान आम्ही ठेवतो. यापूर्वीही त्यांनी 'मी आरती करणार नाही', असे म्हटले होते. त्यांच्या पदाला असे वक्तव्य शोभत नाही. आमचे हिंदूत्व सर्वसमावेशक आहे. सहिष्णुता आमच्या रक्तात आहे. मानवतेचा धर्म म्हणजे हिंदूत्व आहे. मात्र, आतंकी भावनेनी कोणी या देशाचे नुकसान करत असेल तर मग 'जय भवानी-जय शिवाजी', असेही मुनगंटीवार म्हणाले.

हेही वाचा -  शाळांची शिक्षकांना तंबी; सरकारी कोरोना तपासणी केंद्रांतूनच आणलेला अहवाल ग्राह्य धरणार

काय म्हणाले होते हमिद अन्सारी - 
कोरोनाआधी देश धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे, असे वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी केले. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या 'द बॅटल ऑफ बिलॉन्गिंग' या नव्या पुस्तकाच्या डिजिटल प्रकाशाच्या वेळी ते बोलत होते. "कोविड अतिशय वाईट महामारी आहे. परंतु, याआधी आपला समाज धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद या दोन महामारीने ग्रस्त आहे," असे अन्सारी म्हणाले. तसेच "धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवादापेक्षा देशभक्ती ही सकारात्मक संकल्पना आहे," असेही ते म्हणाले.

हेही वाचा - कोरपना नगरपंचायत निवडणूक तापली; दोन गटात हाणामारी, १७ जणांवर गुन्हे दाखल

"आज आपला देश कोरोनाव्हायरसच्या महामारीशिवाय आणखी दोन महामारींचा सामना करत आहे. कोरोनापेक्षा या महामारींचा धोका अधिक दिसत आहे. भारताला धार्मिक कट्टरता आणि प्रखर राष्ट्रवादाने ग्रासले आहे. मात्र, या दोघांच्या तुलनेत देशभक्ती अधिक सकारात्मक संकल्पना आहे. देशप्रेम हे सैन्य किंवा सांस्कृतिकदृष्ट्या जास्त संरक्षणात्मक आहे."

संपादन - भाग्यश्री राऊत
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader sudhir mungantiwar criticized shivsena on hamid ansari statement in nagpur