गट शिक्षणाधिकाऱ्यांचीच चूक! , विस्तार अधिकारी, शिक्षकाचे उत्तर सादर

नीलेश डोये
Saturday, 3 October 2020

गट शिक्षणाधिकारी सादर कर्ता अधिकारी आहेत. आदेशानुसार कारवाई केल्याचे रामटेकचे विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांनी सांगितले.

नागपूर : आदर्श शिक्षक पुरस्कार प्रकरणात रामटेकच्या गट शिक्षणाधिकारी, दोन विस्तार अधिकारी आणि संबंधित शिक्षकाकडून उत्तर सादर करण्यात आहे. विस्तार अधिकारी आणि शिक्षकाने संपूर्ण प्रकरणासाठी गट शिक्षणाधिकाऱ्यांकडे बोट दाखवत एकप्रकारे त्यांनाच दोषी ठरविले आहे.

जि.प.कडून प्राथमिक गटातून १३ व माध्यमिक गटातून २ अशा १५ शिक्षकांना आदर्श शिक्षक या पुरस्काराने गौरविण्यात येते. आदर्श पुरस्कारासाठी शिक्षकाची निवड करताना गैरव्यवहाराच्या आरोपासोबत विभागीय चौकशी सुरू नसणे महत्त्वाचे निकष आहे. परंतु या निकषाला डावलून विभागीय चौकशी सुरू असलेल्या एका शिक्षकाची आदर्श पुरस्करासाठी निवड केली. वृत्त प्रकाशित होताच रामटेकच्या गट शिक्षणाधिकारी संगीता तभाणे, दोन विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि संबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

जाहीर केलेला आदर्श पुरस्कार थांबविला, जि. प.वर नामुष्की

शिक्षकाला जाहीर करण्यात आलेला पुरस्कार थांबविण्याची नामुष्की जिल्हा परिषदेवर ओढवली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नोटीस बजावण्यात आलेल्या सर्वांनी आपले उत्तर सादर केले. गट शिक्षणाधिकारी सादर कर्ता अधिकारी आहेत. आदेशानुसार कारवाई केल्याचे रामटेकचे विस्तार अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांनी सांगितले. तर दुसरे विस्तार अधिकारी यांनी, ‘तालुका स्तरावरून आलेल्या प्रस्तावाची छाननी करण्यात आली व तो समितीकडे पाठविण्यात आला. विभागीय चौकशीचा उल्लेख त्यात नव्हता’, असे स्पष्ट नमूद केल्याची माहिती आहे.

संबंधित शिक्षकानेही गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे बोट दाखविले. त्यांच्या मौखिक आदेशावरून प्रस्ताव सादर केला. विभागीय चौकशी सुरू असल्यास प्रस्ताव करू नये किंवा याबाबतच्या अटी संदर्भात कुठलीही माहिती त्यांनी दिली नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षकाने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. गट शिक्षणाधिकारी तभाणे यांनी कोरोनामुळे अनेक कर्मचारी क्वॉरंटाइन होते. त्यामुळे प्रस्तावांची तपासणी करता आली नाही. चूक झाली माफी मिळावी, असे स्पष्टीकरणात नमूद केल्याची माहिती आहे.

राजकीय दबावाचा वापर
प्रकरण दडविण्यासाठी राजकीय दबावाचा वापर होत असल्याची चर्चा आहे. प्रकरणाशी संबंधित काहींनी राजकीय नेत्यांशी संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून प्रकरण निकाली काढण्यासाठी प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: block education officer's fault! , Extension Officer, submitted the reply of the teacher