सोहळा धम्मदीक्षेचा:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते प्रचंड ग्रंथप्रेमी;  बाबासाहेबांची ग्रंथनिर्मिती म्हणजे एक सोनेरी पान. 

books and granths are favourites of Doctor Babasaheb Ambedkar
books and granths are favourites of Doctor Babasaheb Ambedkar

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विविध विषयांवर लेखन केले आहे. त्यांचा हरेक ग्रंथ अतिशय मौलिक आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, तात्त्विक, सांविधानिक, इतिहास, संशोधन, समीक्षा इत्यादी क्षेत्रांत वाङ्मयीनदृष्ट्या प्रकाश टाकणारे दिशादर्शक ग्रंथलेखन केले आहे. हे लेखन प्रेरक, चेतनादायी ठरते. समाजशास्त्रीय, धर्मशास्त्रीय चिकित्सा करणारे नि आव्हान देणारेसुद्धा आहे. डॉ. आंबेडकरांची ग्रंथनिर्मिती एक सोनेरी पान आहे.

‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अप्रतिम ग्रंथ आहे. ह्या ग्रंथामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. जीर्ण मूल्यांच्या, जातीसंस्थांना जबर धक्का बसला. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समग्र जातिव्यवस्थेची चिकित्सा केली. १९३६ च्या लाहोर अधिवेशनाच्या निमित्ताने लिहिलेले भाषण आहे. ते अधिवेशन रद्द करण्यात आले. आपल्या भाषणातील एकही शब्द गाळणार नाही. भाषणातील मांडलेल्या विचारांबद्दल तसूभरही भूमिका बदलणार नाही. काहीही हो, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तडजोड करणार नाही, अशी कणखरता दाखविली. सदर अधिवेशनातील डॉ. बाबासाहेबांचे भाषण रद्द होणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रकार होता. विवेकवादी, तर्कशुद्ध मतप्रवाहासाठी आग्रही असणारे डॉ. आंबेडकर यांनी जातिसंस्थेपुढे शरणागती पत्करली नाही.

बाबासाहेब आपल्या मतावर ठाम

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ ला धर्मांतराची घोषणा करून तथाकथित हिंदूधर्म संस्कृतीला उघड धक्का दिला होता. हर भगवानदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १४ एप्रिल १९३६ ला पत्रसंवाद झाला होता. त्यात ‘मी हिंदू धर्म सोडणार आहे. हिंदू धर्मातील माझे शेवटचे भाषण आहे’, असे बाबासाहेबांनी प्रतिपादन केले होते. अकारण हिंदू धर्मग्रंथावर नि वेदावर टीका करणे, प्रक्षोभक भाषणाचा भाग न वगळणे तसेच जसेच्या तसे भाषण छापणे म्हणजे अधिवेशन पुढे ढकलावे लागेल, असा समज जातपात तोडक संस्थेचा झाला. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या मतावर ठाम होते. 

जग २१व्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना आजही जातिव्यवस्थेचे चटके सहन करावे लागते. जात दिवसेंदिवस दृश्य-अदृश्य स्वरूपात उग्ररूप धारण करीत आहे. जातिव्यवस्थेमुळे सामाजिक, सांस्कृतिक विकासाला आळा बसतो. जातीमुळे केवळ श्रमाचे विभाजन नाही तर श्रमिकांची विभागणी केली जाते, असा निर्वाळा बाबासाहेबांनी दिला होता.

सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून केली परखड चिकित्सा

‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ हा ग्रंथ ज्वालाग्राही पण मार्मिक विचारांचे द्योतक आहे. आजही आपल्या देशात जातिद्वेष पोसला जातो. त्यामुळे हरेक क्षणी माणसे बळी पडताहेत. त्यासाठी जातीअंताचा लढा तीव्र केल्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत जातीअंत होणार नाही, तोपर्यंत प्रबुद्ध समाज निर्माण होणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून परखड चिकित्सा केली आहे. मानव्यबाधित धर्मग्रंथांमुळे ज्या जनसामान्यांवर अतोनात अन्याय, अत्याचार केला, अशा जातिधर्माला मूठमाती दिली तर वावगे काय? सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक निबंध लादून त्याचे जीवनच बंदिस्त केले. अशा पोथिनिष्ठ समाजव्यवस्थेवर जालीम औषध शोधून विज्ञानवादी, तर्क, विवेकाची सांगड घालून नवसमाज कसा निर्माण करता येईल, हे उत्तर डॉ. आंबेडकरांनी शोधून काढले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शूद्र पूर्वी कोण होते’ ग्रंथातील संदर्भासहित काढलेले निष्कर्ष कटुसत्य आहे. ऋग्वेदात दास हा शब्द ५४ वेळा, दस्यू हा शब्द ७८ वेळा वापरला आहे. दास नि दस्सू हे लोक एकच आहेत. शूद्रांचा उल्लेख फक्त एक वेळाच आला आहे. याचा अर्थ त्या लोकांना विशिष्ट नामोल्लेख करून त्या जमातीवर, टोळीवर गुन्हेगारीचे शिक्कामोर्तब करणे हे एक षडयंत्र आहे, हे आरोप निराधार असल्याचा निर्वाळा आपल्या संशोधनातून डॉ. आंबेडकरांनी सिद्ध केला. उत्तर ध्रुवावरून आलेल्या आर्य लोकांनी इथल्या मूळ रहिवाशांवर अर्थात दास, दस्यूंवर हल्ला करून दहशत पसरविली. पण, हे लोक आर्यांपेक्षा अधिक पराक्रमी होते. तसेच सुसंस्कृत होते. अस्पृश्य मूळचे कोण? किंवा ते अस्पृश्य कसे झाले? या डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथात प्रत्येक अथवा दैनंदिन व्यवहारातील सांगोपांग चर्चा केली आहे. अस्पृश्य लोक आणि अस्पृश्यता कशी पैदा झाली, यावर डॉ. आंबेडकरांनी भाष्य केले.

‘द प्राब्लेम ऑफ रुपी’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी आपले विचार प्रकट करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरे तर अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांना दूरदृष्टी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी प्रोफेसर एडवीन कॅनान आपल्या प्रस्तावनेत ‘बाबासाहेबांनी सांगितलेला विचार नव्यांसाठी प्रेरणादायी ठरतो’, असे सूचक विधान करतात. भारतीय उपखंडामध्ये १८०० ते १८९३च्या काळात व्यवहारार्थ चलनाचा उपयोग कसा होत गेला व त्याचे परिणाम कसे झाले, याची समग्र चिकित्सा डॉ. आंबेडकरांनी पहिल्या प्रस्तावनेत केली आहे.

‘भारताचे विभाजन अद्वितीय ग्रंथ

जागतिक पातळीवर आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. अर्थव्यवस्था कमालीची कोलमडली आहे. त्यामुळे जीडीपीचा दर अत्यंत कमी झाला आहे. भारतामधील अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारेल असे कधी वाटत नाही. कारण, दिवसेंदिवस बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. उद्योगधंदे अखेरचा श्वास घेत आहेत. नीती आयोगामुळे संपूर्ण जनतेचे कंबरडे मोडले आहे. ‘भारताचे विभाजन’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अद्वितीय ग्रंथ. या ग्रंथाची पहिली आवृत्ती १९४० साली प्रकाशित झाली असून, २८ डिसेंबर १९४० ला प्रस्तावना लिहिली आहे. एखाद्या राष्ट्रनिर्मितीचा सात वर्षांअगोदर वेध घेणे ही जगातल्या इतिहासातील पहिलीच घटना असावी. ‘थॉट ऑफ पाकिस्तान’ या ग्रंथाची निर्मिती नगरमध्ये झाली. दादासाहेब पी. जी. रोहम यांना ग्रंथाचे श्रेय देतात. हे दादासाहेब रोहम यांना लिहिलेल्या पत्रात नमूद करतात. हा ग्रंथ फक्त २१ दिवसांत पूर्ण झाला. हिंदू, मुसलमानांच्या समग्र समस्यांचा मुक्त आढावा घेतला आहे. १ जानेवारी १९४५ ला दुसऱ्या प्रकाशन आवृत्तीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपली भूमिका विशद करतात. तसेच हा ग्रंथ रमाईला अर्पण करतात. आजही पाकिस्तानची स्थिती ‘जैसे थे’ आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेमध्ये अल्पसंख्याकांच्या मूलभूत हक्कांची तरतूद करणे ही काळाची गरज आहे. तसेच स्वतंत्र भारताच्या इतिहासात अस्पृश्यांचे राजकीय स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती. परंतु, मागणीला विरोध केला गेला. राष्ट्रहितासाठी बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाचा त्याग केला. राजकीय मतदारसंघाचे अस्तित्व बाद झाले. २३ सप्टेंबर १९३२ला समेट घडविला. त्या पुणे कराराला विजयी दिवस म्हटले तर वावगे ठरत नाही. या ग्रंथासाठी प्राचार्य मनोहर चिटणीस आणि एस. सी. जोशींचे सहकार्य मिळाले आहे, अशी भावना डॉ. आंबेडकर व्यक्त करतात.

‘रिडल्स इन हिंदूझम’ 

हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संशोधन ग्रंथ महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केला. तेव्हा काही तथाकथित संघटनांनी महाराष्ट्रभर वादळ उठविले होते. या ग्रंथामध्ये राम व कृष्णाच्या कोड्याची उकल करून धर्मचिकित्सा केली. या धर्मव्यवस्थेतून बहुजनांनी बंधमुक्त व्हावे, असा दिशादर्शक विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथात मांडतात. या ग्रंथाचा परिचयात्मक आढावा घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, सर्वसामान्य माणसाने हिंदू मानसिकतेच्या बाहेर पडावे, यासाठी धर्मचिकित्सा करणे काळाची गरज होती. तरच हिंदू समाज जागृत होईल, असा आशावाद डॉ. आंबेडकरांनी व्यक्त केला होता. परंतु, आजही बहुजन समाज भरडला जात आहे. बहुजन समाजातील सकस नेतृत्व पुढे येत नाही तोपर्यंत परिवर्तन अशक्य आहे.

स्वामी वेदांत तीर्थ यांच्या ‘राष्ट्ररक्षा के वैदिक साधन’ या ग्रंथातील प्रस्तावना अत्यंत मौलिक आहे. या प्रस्तावनेत वेदकाळ आणि आधुनिककाळ या दोन्ही कालखंडांमध्ये काही तफावत आहे का, असा उभा प्रश्न निर्माण केला आहे. वैदिक काळातील संस्कृती अध्यात्माच्या प्रपंचात गुरफटली आहे. त्यामुळे या संस्कृतीशी जुळलेली नाळ आधुनिक काळात पचनी पडणार नाही. मानवाच्या उन्नतीसाठी बाधक आहे. कारण, वेदकालीन धर्मसंस्कृतीने माणसाच्या अनेक पिढ्या ‘लॉकडाउन’ केल्यात. प्राचीन काळातील जुनी रीत आधुनिक भारताला कशी पचनी पडेल?

 ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला. ‘जिवो जीवस्य जीवनम’ हे जीवनवादी तत्त्वज्ञान आहे. अंधारात चाचपडणाऱ्या माणसांना डोळस बनविणारा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाची प्रस्तावना १५ मार्च १९५६ ला उपलब्ध होती. ६ एप्रिल १९५६ ला प्रस्तावनेतील काही सूचना दुरुस्ती केली होती. या ग्रंथाची पहिली आवृत्ती पीईएसने १९५७ ला प्रकाशित केली; तेव्हा ग्रंथाच्या आवृत्तीमध्ये प्रस्तावना छापलीच नाही, हे एक कोडेच आहे. त्यावेळी पीईएसचे अध्यक्ष आर. आर. भोळे होते.

‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचा चार भागांमध्ये विस्तार केला आहे. १) बुद्धांनी प्रव्रज्या का घेतली? (२) चार आर्यसत्ये (३) आत्मा, कर्म आणि पुनर्जन्म (५) भिक्खू. या ग्रंथात तत्त्वज्ञान, इतिहास, संस्कृती आणि काव्यमयतेचे अनोखे दर्शन होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्तावनेत विज्ञान, तर्क आणि विवेकाची कास धरून बुद्धाचे जीवन आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचा सार सांगितला आहे. या धम्मग्रंथाचे डॉ. भदन्त आनंद कौशल्यायन यांनी प्रथम हिंदी भाषेत रूपांतर केले.

‘बौद्ध पूजापाठ’ हा 

अतिशय छोटेखानी पुस्तकाची प्रस्तावना डॉ. बाबासाहेबांनी लिहिली. १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माच्या दीक्षेनंतर बौद्ध धम्म म्हणजे काय, त्याचे मूल्य काय, त्याची आचारसंहिता कशी असेल, यासंबंधी अत्यंत मार्मिक विश्लेषण ‘बौद्ध पूजापाठ’मध्ये केले आहे. वि. रा. रणपिसेद्वारा भारतीय बौद्धजन समितीतर्फे पहिले प्रकाशन झाले होते. तसेच या पुस्तकाचे कॉपीराइटसुद्धा समितीकडे दिले होते. ‘बौद्ध पूजापाठ’मध्ये १० प्रकरणे आहेत. १) सरणयंत्र २) पज्वसीनानि ३) बुद्धवंदना ४) धम्मवंदना ५) संघवंदना ६) पूजा ७) सब्बसुगाथा ८) धम्मपालन गाथा ९) रतनसुत्त ९) जप. बौद्ध धम्म हा सुंदर जीवन जगण्याचा मध्य मार्ग आहे. ‘नत्थि मे सरणं अञ्ञं, बुद्धो मे सरणं वरं’ आणि २२ प्रतिज्ञांमध्ये बौद्ध अनुयायांचा जीवनार्थ दडलेला आहे.

 लेखक - महेंद्र गायकवाड

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com