कलेतून साकारतोय व्यवसाय

राघवेंद्र टोकेकर
शनिवार, 18 जानेवारी 2020

स्वप्निल शिवाजी मसराम या तरुणाने वस्तीतील आदिवासी मित्रांना सोबत घेऊन लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनाचे कार्य सुरू केले. प्रारंभीच्या काळात जनजागृतीच्या माध्यमातून विविध कार्य करणाऱ्या वीर बाबुराव शेडमाके युवा बचतगटाने उद्योग क्षेत्रात पदार्पण करत मोदी जॅकेट तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला.

नागपूर : सध्या देशात मोदी जॅकेटची फॅशन आहे. प्रत्येकजणच एक तरी मोदी जॅकेट घेण्याचे ठरवतो. त्यातही नवे काहीतरी असेल तर ग्राहकांच्या त्यावर उड्या पडतात. आणि असे नवे काहीतरी करण्यासाठी कलावंताचे मन असावे लागते. असे कलावंत खेडोपाडी आहेत. मात्र त्यांची ओळख व्हायला एखादे निमित्त हवे असते. गोंडी, आदिवासी व वारली कलेचा प्रचार करणाऱ्या एका तरुणाने स्वत:चा आगळा वेगळा व्यवसाय स्थापन केला. त्याने तयार केलेल्या मोदी जॅकेटच्या निर्मितीतून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

 सविस्तर वाचा - तीन मुलांच्या आईला प्रियकराने दिला धोका अन झाले विपरित

स्वप्निल शिवाजी मसराम या तरुणाने वस्तीतील आदिवासी मित्रांना सोबत घेऊन लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनाचे कार्य सुरू केले. प्रारंभीच्या काळात जनजागृतीच्या माध्यमातून विविध कार्य करणाऱ्या वीर बाबुराव शेडमाके युवा बचतगटाने उद्योग क्षेत्रात पदार्पण करत मोदी जॅकेट तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. विशेष म्हणजे मोदी जॅकेटच्या निर्मितीतून वारली, गोंडी व आदिवासी कलेविषयी जनजागृती करण्याचा स्वप्निल मसराम यांचा मानस होता. बचतगटात काम करणाऱ्या तरुणांना रोजगार मिळाला होता. त्यामुळे अनेकांच्या प्रयत्नांना नवी उभारी आली होती. सुरूवातीला गोंडी व वारली कलेची छपाई असलेले मोदी जॅकेट तयार करण्याचे काम ही मंडळी करीत होती. मात्र जॅकेटची वाढती मागणी बघता या बचतगटाने साध्या कापडावर वारली कलेची छपाई करून त्याचे मोदी जॅकेट शिवणे सुरू केले. इतकेच नव्हे तर स्वप्निल मसराम यांच्या बचतगटात लॅपटॉप बॅग, कॉलेज बॅग, फाईल फोल्डर अशा सर्व प्रकारचे शिलाईचे काम करण्यात येते आहे.

विविध प्रदर्शनांत उपस्थिती
शहरात आयोजित होणाऱ्या विविध प्रदर्शनात वीर बाबुराव शेडमाके बचत गटाचे दालन हमखास दिसते. बचत गटाचे सदस्य वारली व गोंडी संस्कृतीच्या संवर्धनाचे महत्त्व प्रदर्शनाला भेट देणाऱ्या लोकांना सांगतात. धरमपेठ भागात या बचतगटाचे कार्यालय असून, अवघ्या 50 हजारांच्या गुंतवणुकीतून सुरू झालेले हे काम आज लाखोंचा व्यवसाय करतो आहे. आज विविध आकारातील, विविधरंगी आणि विविध कला कापडावर प्रिंट करून त्याचे मोदी जॅकेट शिवण्याचे यशस्वी काम या बचतगटात होते आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: business devolped with warali art