'फेक पोर्टल’वर जाहिरात करून जाळ्यात अडकविण्याचे ‘ते’ करायचे उद्योग, मग घडले असे…

चंद्रशेखर कडू
Friday, 14 August 2020

ओएलएक्स’वरती नोकरीची खोटी जाहिरात करून तरुणांना आपल्याकडे आकर्षित केले.  हळूहळू त्यांना जाळ्यात अडकविणे सुरू केले. कालांतराने अनेकांना आपण फसविण्यात आल्याची जाणीव झाली. आणि मग इथूनच फुटले सगळे बिंग...

काटोल (जि.नागपूर) : दिल्लीत राहून त्यांनी एक ‘फेक पोर्टल’ तयार केले. ‘ओएलएक्स’वरती नोकरीची खोटी जाहिरात करून तरुणांना आपल्याकडे आकर्षित केले.  हळूहळू त्यांना जाळ्यात अडकविणे सुरू केले. कालांतराने अनेकांना आपण फसविण्यात आल्याची जाणीव झाली. या ऑनलाइन गंडा घालणाऱ्या टोळीला काटोल पोलिसांनी दिल्लीत जाऊन गजाआड केले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन महिला व दोन पुरूषाचा समावेश आहे़.  चारही आरोपींना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे़.

अधिक वाचा : कोरोना काळातही झाली ‘या’ तालुक्यात एक लाख ८० हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी

टावर सुपरवायजर या पदावरती नोकरी लावून देण्याचे आमिष
सूरज सिंग, संजय कुमार, खुशबू व मेघा बत्रा (सर्व रा.दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत़. काटोल येथील अक्षय नेवासकर यांनी काटोल पोलिस ठाण्यात आरोपी निधी उर्फ खुशबु वर्मा, सूरज सिंग व संजय कुमार यांनी संगनमत करून ओएलएक्स नावाचे गुगलवरती ‘फेक पोर्टल’ तयार केले व नेवासकर यांना रिलायंस जिओ लिमिटेड येथे  टावर सुपरवायजर या पदावरती नोकरी लावून देण्याचे आमिष दिले. नियुक्तीचे खोटे अप्रुवल लेटर व जॉब लेटर दिले व जॉबकरीता प्रोसेसिंग फी व ट्रेनिंगला नागपूर येथे पाठविण्याकरीता वेळोवेळी पैसे जमा करून एकूण२ लाख ७०हजार, ४००रुपये नेवासकर यांच्याकडून आरोपींनी त्यांच्या बँक खात्यात स्वीकारून फसवणूक केली होती़, तशी रीतसर तक्रार नेवासकर यांनी काटोल पोलिस ठाण्यात केली होती़. काटोलचे ठाणेदार महादेव आचरेक यांनी पोलिस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल यांची चम्मू दिल्लीला पाठवून ही कारवाई केली.

अधिक वाचा  :कळमेश्वर पालिकेत काय घडले की बैठकीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मारली दांडी…

ऑनलाईन फुड बोलावले अन् अडकले
प्रकरणाचा तपास करण्यासाठी ३ ऑगस्टला पोलिसांनी एक पथक दिल्ली येथे रवाना केले़. तपास पथकाने गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्याकरीता आरोपीने वापरलेल्या बँक खात्याच्या आधारे दिलेल्या पत्यावर शोध घेतला असता आरोपींनी त्या पत्यावरून स्थानांतरण केले होते़. आरोपीने त्यांच्या खात्यातून झोमॅटोवरून बोलविलेल्या शेवटच्या ‘फुड डिलीवरी’चा पत्ता माहिती करून त्या पत्यावर पोलिसांनी छापा मारला. आरोपी खुशबू उर्फ निधी वर्मा तसेच आरोपी संजय कुमार यांना अटक केली़. त्यांच्या ताब्यातून एक लॅपटॉप, तीन मोबाईल, कॉलींगकरीता वापरण्यात आलेले विविध कंपनीचे२४ मोबाईल सिम्स, चार विविध बॅंकेचे एटीएमकार्ड जप्त करण्यात आले़.

अधिक वाचा  :  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले हे विधान…

दिल्लीतच होते ‘कॉल सेंटर’
गुन्ह्यातील इतर आरोपी सुरजसिंग याचा शोध घेऊन त्याचे नवी दिल्ली येथील कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा मारला. आरोपी सूरज सिंग व मेघा बत्रा हे या कॉल सेंटरमध्ये आढळले.  त्यांच्या ताब्यातून एकूण ५७८ विविध रिक्त जॉब अप्लीकेशन फार्म, ८ विविध कंपनीचे मोबाईल व मोबाईल बिल्स, नोटबुक्स, विविध बॅंकेचे पासबुक, सिम खरेदीकरीता विविध आधारकार्ड, खोटे स्टॅम्प, क्रेडिट व एटीएम कार्ड, २ पेटीएम क्युआर कोड जप्त करण्यात आले़. याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चारही आरोपींना १७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली़ आहे.

संपादन  : विजयकुमार राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The business of doing 'it' by trapping by advertising on 'fake portals', then it happened