esakal | मिळालं चिन्हं, वाजले ढोल अन् सुरु झाली प्रचाराची रणधुमाळी; कोण मारणार ग्राम पंचायत निवडणुकीत बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

campaigning Started For Gram Panchayat Elections in Nagpur district

खऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीला आजपासून खरी सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. 

मिळालं चिन्हं, वाजले ढोल अन् सुरु झाली प्रचाराची रणधुमाळी; कोण मारणार ग्राम पंचायत निवडणुकीत बाजी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर:  येत्या १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर चिन्हाचे वाटप झाले. आता खऱ्या प्रचाराच्या रणधुमाळीला आजपासून खरी सुरुवात झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. 

आमदार,खासदारही लागले कामाला 

मांढळः आपल्याच पक्षाचे जास्तीत उमेदवार निवडून आले पाहिजे यासाठी सर्वच पक्षाचे तालुका, जिल्हा प्रमुखासह आमदार, खासदारही कामाला लागले आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीच तापू लागले आहे.महाविकास आघाडी व भाजप यांच्यात मुख्य लढत होईल. स्थानिक राजकीय परिस्थिती पाहून समिकरणे बदलणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार कृपाल तुमाणे, आमदार राजू पारवे, तसेच भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी, बसपा या पक्षांचे जिल्हा पदाधिकारी आपापल्या पक्षाची आढावा बैठका घेत आहेत. शिवसेनेची नुकतीच आढावा बैठक तालुक्यात पार पडली. ही आढावा बैठक खासदार कृपाल तुमाने, संपर्कप्रमुख सुधीर सुर्यवंशी, आमदार आशीष जयस्वाल, जिल्हाप्रमुख संदीप ईटकेलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी उपजिल्हाप्रमुख वर्धराज पील्ले, देवेन्द्र गोडबोले, मंगल पांडे, तालुकाप्रमुख विवेक तुरक, राजू भोसकर, सदुकर हटवार, वासू भोयर, हरीष कडव, संदीप निम्बर्ते, संजय लडी, माजी जिल्हाप्रमुख पांडुरंग बुराडे, विधानसभा संघटक नरेश धोपटे, खुशाल लांजेवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख कमलेश शरनागत, आकाश भोयर, युवासेना तालुका प्रमुख नितेश वांगे, देवेश ठाकरे व शिवसैनिक उपस्थित होते. 

अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

पुन्हा तीच पुनरावृत्ती होणार? 

कळमेश्वरः तालुक्यातील ५ पैकी १ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने आता ४ ग्रामपंचायतीकरिता होऊ घातलेल्या निवडणुकीकरिता सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४ ग्रामपंचायतीपैकी २ ग्रामपंचायतीतील १० जणांनी अर्ज मागे घेतल्याने आता एकूण १३ प्रभागाकरिता ३८ ग्रामपंचायत सदस्याकरिता ९८ उमेदवार रिंगणात असणार आहेत. या ४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकूण ८३८० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरुष मतदार ४२८३ तर स्त्री मतदार ४०९७ आदींचा समावेश असणार आहे. सोनपूर - आदासा गटग्राम पंचायत ही ९ सदस्याची असून या ग्रामपंचायती करिता नऊच अर्ज दाखल झाल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध होणार, हे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये कोहळी- मोहळी, सावंगी-घोगली, सोनेगाव-पोही, सेलू-गुमथळा या ग्रामपंचायतीचा समावेश असून निवडणुकीला उधाण आले आहे. 

आठ उमेदवारांची रिंगणातून माघार 

हिंगणाः तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या ५१ सदस्यांसाठी १४७ अर्ज दाखल करण्यात आले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे आता पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. हिंगणा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या ५१ सदस्.ासाठी सातगाव ५१ अर्ज किन्ही-धानोली १८, दाभा १९, खडकी २७ तर सावंगी-आसोला ३२ असे एकूण १४७ अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सातगाव ग्रामपंचायतीमधून एक अर्जन, दाभा एक, खडकी सहा असे आठ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यानंतर किन्ही- धानोली १८ व सावंगी -असोलामध्ये ३२ अर्ज कायम राहिले. यामुळे १४७ अर्जांपैकी आता आठ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर १३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशिब आजमावणार आहेत. 

जटामखोरा ग्रामपंचायत बिनविरोध 

केळवदः ग्रामपंचआायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी(ता.४) सावनेर तालुक्यातील जटामखोरा गटग्रामपंचायतच्या सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेस पक्ष समर्थीत पाच उमेदवार बिनविरोध निवडूण आले. आज उर्वरित दोन जागांसाठी असलेल्या पाच उमेदवारापैकी गीता सतीश राव, सारीका प्रवीण नेरकर, रिना सचिन रावसाहेब यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ममता दिलीप ढोबळे इतर मागासवर्ग महिला प्रवर्गातून विजयी घोषीत करण्यात आले. रिना सचिन रावसाहेब सर्वसाधारण महीला प्रर्वगातून वार्ड क्र.३ मधून विजयी घोषीत करण्यात आल्या. यामुळे या ग्रामपंचायतमधील सर्व सात सदस्य बिनविरोध निवडूण आल्याने मागील दहा वर्षापासून या ग्रामपंचायतवर बिनविरोध निवडणूक होत असल्याने शासनाच्या वतीने दिला जाणाऱ्या पुरस्कारातील निधीतून गावाचा विकास साधला जात आहे. सलग दहा वर्षांपासून बिनविरोध निवडणूक जिंकणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांनी राज्याचे पशुसर्वंन दुग्धविकास मंत्री सुनील केदार, तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सतीश लेकुरवाळे, माजी सरपंच सोनू रावसाहेब यांना श्रेय दिले. 

ऩरखेड तालुक्यात १४ बिनविरोध 

जलालखेडाः ३१९ उमेदवारांना चिन्हवाटप झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराच्या रणधुमाळीला खरी सुरुवात झाली आहे. तालुक्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे, तर निकाल १८ जानेवारीला लागणार आहे. नरखेड तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ३६१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते पण ४२ उमेदवारांनी अर्ज परत घेतल्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ३१९ उमेदवार आपले नशीब अजमावणार आहेत. १४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. 

अकरा ग्रामपंचायतीच्या ९६ जागेसाठी लढत रंगणार 

सावनेरः शेवटल्या दिवसाला ८२ जणांनी उमेदवारी माघे घेतल्याने २४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले. यातील सात सदस्यांचे संख्याबळ असलेल्या जटामखोरा ग्रामपंचायतमध्ये एका जागेसाठी एकच अर्ज शिल्लक राहिल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली. त्यामुळे आता तालुक्यात उर्वरित ११ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. यातील पाटणसावंगी येथील ३ सदस्य बिनविरोध व नांदोरी, सावंगी -हेटी एक असे एकूण १४ सदस्य बिनविरोध झाल्याने आता ९६ जागेसाठी २४० उमेदवारांमध्ये निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बारा ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. यातील जटामखोरा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच खाते उघडले आहे, तर जैतपूर व खुरसापार ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस समर्थीत दोन पॅनल आमने-सामने ठाकल्याने येथे काँग्रेस समर्थकांमध्ये निवडणूक होत असल्याचे चित्र दिसत आहे. 

उर्वरित आठ ग्रामपंचायतीपैकी सात ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेस व भाजप समर्थीत पॅनलमध्ये सरळ लढतीचे चित्र दिसत आहे. पाटणसावंगी ग्रामपंचायतसाठी होणाऱ्या १७ जागेच्या लढतीमध्ये वार्ड क्र.6 मध्ये काँग्रेस समर्थीत 3 उमेदवार राजेश्री कश्यप, अनिता शिरसाट, इंदिरा काळे अविरोध झाले आहेत. तर पोटा ग्रामपंचायतमध्ये तिरंगी चौरंगी लढतीचे चित्र रंगणार असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितल्या जात आहे. मंत्री सुनिल केदारांचे खंदे समर्थक जि.प.चे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे सहकाऱ्यांसह काँग्रेस समर्थीत उमेदवारांचा मोर्चा सांभाळत असल्याने भाजपची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे. मंत्री सुनील केदार यांच्या गृहक्षेत्रातील सतरा सदस्यांचे संख्याबळ असलेल्या पाटणसावंगी ग्रामपंचायतमध्ये वार्ड क्रमांक सहा येथील राजेश्वरी कश्यप, अनिता शिरसाट, इंदिरा काळे तिघी काँग्रेस समर्थीत उमेदवार येथील जिल्हा परिषद सदस्य ममता कोकड्डे यांच्या प्रयत्नामुळे बिनविरोध झाले आहे. 

२३ उमेदवार बिनविरोध 

कुहीः तालुक्यात होऊ घातलेल्या २५ ग्रा.प.च्या १९२ जागांसाठी ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. छाननीनंतर उरलेल्या ४९० अर्जापैकी आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ३९ जणांनी आपले अर्ज मागे घेतले असून एकूण २१५ जागांपैकी २३ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या २१५ जागांसाठी एकूण ४९५ इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. 

जाणून घ्या - अखेर वाघीण आणि बछड्यांच्या मृत्यूचं रहस्य उलगडलं; शवविच्छेदनात पुढे आला धक्कादायक प्रकार

यातील ३१ डिसेंबर रोजी छाननीप्रक्रियेत ५ अर्ज बाद झाले. उरलेल्या ४९० उमेदवारी अर्जापैकी ३९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने तालुक्याचा ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात ४५१ उमेदवार सज्ज झाले आहेत. त्यानंतर निवडणूक विभागातर्फे उमेदवारांना चिन्हवाटप झाले असून आजपासून निवडणूक असलेल्या गावात प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने यंदाच्या मतदानासाठी तब्बल १९२ निवडणूक चिन्हांची यादी जाहीर केली होती. यामध्ये प्रथमच संगणकाचा माउस, पेनड्रॉइव्ह, आणि मोबाईल चार्जरचा समावेश केला आहे . 

संपादन - अथर्व महांकाळ