सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अभ्यासक्रमात होणार हे बदल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जून 2020

सीबीएसईद्वारे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या परीक्षांचा तारखा ठरल्या असल्या तरी, त्या घेण्याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे.

नागपूर : कोरोनामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनसीईआरटीद्वारे अनेक प्रकरणांचे रूपांतर सेल्फ स्टडी वा असाईमेंट, प्रकल्प स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. 

सीबीएसईद्वारे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या परीक्षांचा तारखा ठरल्या असल्या तरी, त्या घेण्याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. मात्र, सीबीएसईने भविष्याचा विचार करीत, अभ्यासक्रमात बरेच बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी माहिती दिली होती. 

लग्नाचे आमिष दाखवून केले महिलेचे शोषण, परंतु ऐनवेळी घेतली ही भूमिका

त्यानुसार सीबीएसईने एनसीईआरटीमार्फत अभ्यासक्रमात बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने सेल्फ स्टडी वा असाईमेंट, प्रकल्पाचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे या विषयावर आधारित प्रश्‍न परीक्षेत विचारण्यात येणार नाही. केवळ ज्ञान मिळविण्यासाठी त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे.

यात प्रामुख्याने इतिहासामधील "द एज ऑफ इंडस्ट्रीयलायझेशन, गणितामधील "एरिया ऑफ ट्रॅगल ऍन्ड फ्रुस्टम ऑफ कोन', विज्ञानामधील "फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स ऍन्ड नॉन मेटल्स आणि टिंडल इफेक्‍ट यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे. 

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न जटिल झाला आहे. विद्यापीठाने परीक्षा रद्द केल्या असून, शाळा सुरू होणार नसल्या तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये, यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईल शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणार असल्याचे सांगितले जाते. 

अभ्यासक्रम कमी करण्याला विरोध 

नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्याला काही तज्ज्ञांकडून विरोध होत आहे. यापूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी अभ्यासक्रम असणारे विद्यार्थी तुलनेत मागे पडणार असल्याचा तर्क देण्यात आलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांशी भेदभाव होण्याचाही मुद्दा तज्ज्ञांनी समोर केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CBSE X syllabus will be less