आत्महत्या केल्याशिवाय नियुक्ती नाही का? भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

अतुल मेहेरे
Tuesday, 3 November 2020

निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेले उमेदवार आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आले असून, त्यांची समजूत काढून थांबविण्यात आले आहे. महावितरणमधील या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

नागपूर : साडेनऊ हजार उमेदवार महावितरणच्या नियुक्ती आदेशाची वाट पाहात आहेत. महावितरणने सुमारे तीन महिन्यांपूर्वी या प्रकरणी शासनाचे मार्गदर्शन मागविले होते. पण शासनाने अजूनपर्यंत मार्गदर्शन दिले नाही. मार्गदर्शन देण्यासाठी ठाकरे सरकार एवढा वेळ लावत आहे, तर नियुक्ती आदेश कधी देणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नागपुरात मंगळवारी संविधान चौकात सरकारच्या या नकारात्मक भूमिकेचा आणि दिरंगाईचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, भाजयुमोच्या शिवानी दाणी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भाजप कार्यकर्त्यांनी डोक्यावर काळ्या टोप्या आणि गळ्यात काळे दुपट्टे घालून ठाकरे सरकारचा आणि ऊर्जामंत्र्यांचा निषेध केला.

महत्त्वाची बातमी - सहा वर्षीय चिमुकलीला कॅन्सरसारखा दुर्धर आजार; हतबल बापाचा मुलीला वाचविण्यासाठी संघर्ष

निवडीची प्रक्रिया पूर्ण झालेले उमेदवार आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आले असून, त्यांची समजूत काढून थांबविण्यात आले आहे. महावितरणमधील या उमेदवारांच्या नियुक्तीसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना यापूर्वी निवेदने देऊन नियुक्त्या करण्याची विनंती करण्यात आली होती. पण त्यांनी या विषयाकडे लक्ष दिले नाही. महावितरणने मात्र हा प्रश्न सोडविण्याऐवजी शासनाकडे टोलवला आणि उमेदवारांना लटकते ठेवले. शासनाने बेरोजगार उमेदवारांची क्रूर थट्टा चालविली आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला.

अधिक माहितीसाठी - खासदार बाळू धानोरकरांचा इतिहास काँग्रेसमध्ये सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल

आत्महत्या होण्याची वाट पाहात आहे काय?

महावितरणमधील पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक, ४१२ शाखा अभियंते आणि लाईनमन अशा सुमारे साडेनऊ हजार पदांच्या नियुक्तीची पूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. या उमेदवारांना फक्त नियुक्त्याच देणे शिल्लक आहे. शासन विद्युत सहायक आणि अन्य उमेदवारांच्या आत्महत्या होण्याची वाट पाहात आहे काय, असा संतप्त सवाल माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकार आणि ऊर्जामंत्र्यांना केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrasekhar Bavankule Thackeray government angry question