युती सरकारने विदर्भाला दिलेले चार हजार कोटी का परत गेले?

अतुल मेहेरे
Saturday, 28 November 2020

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती हा विदर्भातील जनतेसाठी काळा दिवस असून मागील एक वर्षाच्या काळात या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. केवळ श्रेयवादाच्या लढाईमुळे सर्व विकास कामे ठप्प पडली असून या कामांसाठी निधीही उपलब्ध करून दिला नाही, असे बावनकुळे म्हणाले.

नागपूर : राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी दिलेला चार हजार कोटी रुपयांचा निधी सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे परत गेला, असा आरोप माजी ऊर्जा मंत्री व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती हा विदर्भातील जनतेसाठी काळा दिवस असून मागील एक वर्षाच्या काळात या सरकारने विदर्भाच्या विकासासाठी कोणताही निर्णय घेतला नाही. केवळ श्रेयवादाच्या लढाईमुळे सर्व विकास कामे ठप्प पडली असून या कामांसाठी निधीही उपलब्ध करून दिला नाही, असे बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीला निधी मिळालेला नाही. मुख्यमंत्री मुंबईचे, उपमुख्यमंत्री पुण्याचे आणि मंत्री आपापल्या मतदारसंघाचे, असा कारभार सध्याच्या सरकारचा सुरू आहे.

हेही वाचा - भर रस्त्यात अडवून केला अल्पवयीन युवतीचा विनयभंग;...

श्रेय घेण्याची चढाओढ -
काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या सरकारमध्ये श्रेय घेण्याच्या चढाओढीत विदर्भातील विकास कामे आणि योजना फसल्या आहेत. त्यामुळे विदर्भावर अन्याय केला जात आहे. दरवर्षी डिसेंबरमध्ये होणारे अधिवेशनही या सरकारने पळविले. यंदा पावसामुळे सोयाबीन, तूर, कापूस, धान आणि फळ भाज्यांचे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. पण सरकारने फक्त शंभर कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पूरग्रस्त भागातील नागरिक आजही शाळा आणि अंगणवाड्यांमध्येच राहत आहेत. त्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविला गेला नाही. 

हेही वाचा - बळीराजा पुन्हा संकटात! तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा हल्ला; ढगाळ वातावरणाचा परिणाम 

पाच कोटी वीज ग्राहकांचा प्रश्‍न प्रलंबित - 
पाच कोटी वीज ग्राहकांच्या वीज बिलाचा प्रश्न या सरकारला सोडविता आलेला नाही. ऊर्जा मंत्र्यांनी दिलेले आश्वासन त्यांच्या पक्षाचे मंत्री आणि सरकारमधील मंत्री खोडून काढतात, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले. गोरगरीब, निराधारांसाठी असलेली संजय गांधी योजना व अन्य योजनांच्या समित्या अजून स्थापन झालेल्या नाही. परिणामी लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत. रेशन कार्ड आहे, पण आरसीआयडी नंबर मिळत नाही. रस्ते, वीज, पाणी यांचा बॅकलॉग वाढत आहे, याकडे लक्ष वेधून बावनकुळे म्हणतात-जलसंधारणाची कामे बंद पडली आहेत. सरकारच्या सापत्न वागणुकीमुळे वर्षभरात विदर्भाच्या आणि जनतेच्या वाट्याला अन्यायाशिवाय काहीच आले नाही. मग वर्षपूर्तीचा आनंद साजरा करून विदर्भातील जनतेच्या दु:खावर मीठ चोळले जात असून सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरलेले असल्याचा सणसणीत आरोपही बावनकुळे यांनी केला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chandrashekhar bawankule criticized mahavikas aghadi government in nagpur