चेतन चौहान यांनी केली होती विदर्भाच्या गोलंदाजांची पिटाई.. क्रीडाभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही नागपूरला दिली भेट 

नरेंद्र चोरे 
Sunday, 16 August 2020

महाराष्ट्र आणि विदर्भ संघादरम्यानचा हा तीनदिवसीय सामना पुणे येथे खेळला गेला होता. विदर्भाने साखळी फेरीत शानदार कामगिरी करून प्रथमच उपांत्यपूर्वफेरी गाठली होती.

नागपूर : भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चेतन चौहान हे क्रिकेट व इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकवेळा नागपुरात येऊन गेले. मात्र त्यांनी विदर्भ रणजी संघाला दिलेल्या जखमा कुणीही विसरू शकत नाही. रणजी करंडकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात चौहान यांनी विदर्भाच्या गोलंदाजांची जबरदस्त पिटाई करून विदर्भाचे स्वप्न धुळीस मिळविले.

महाराष्ट्र आणि विदर्भ संघादरम्यानचा हा तीनदिवसीय सामना पुणे येथे खेळला गेला होता. विदर्भाने साखळी फेरीत शानदार कामगिरी करून प्रथमच उपांत्यपूर्वफेरी गाठली होती. उपांत्यपूर्व लढतीत विदर्भापुढे यजमान महाराष्ट्राचे आव्हान होते. मात्र त्या सामन्यात विदर्भाला महाराष्ट्राकडून एक डाव व 117 धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला.

जाणून घ्या - शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले हे विधान...

405 धावांची भली मोठी भागीदारी 

विदर्भाला अडीचशे धावांत गुंडाळल्यानंतर महाराष्ट्राने 2 बाद 560 धावांचा विशाल डोंगर रचला होता. सलामीवीर चौहान यांनी सर्वाधिक 207 व त्यांचे सलामीचे सहकारी मधुकर गुप्ते यांनी पहिल्या गड्यासाठी 405 धावांची भली मोठी भागीदारी करून वैदर्भीय गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. जुन्या व्हीसीए मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यातही ते खेळले होते. दुर्दैवाने दोन्ही डावांमध्ये ते लवकर बाद झाले. त्यानंतर मात्र नागपूरकरांना त्यांचा खेळ पाहायला मिळाला नाही.

डॉ. हेडगेवार स्मृती भवनाला भेट 

याशिवाय क्रीडाभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी दोन-तीनवेळा नागपूरला भेट दिली. 2017 मध्ये रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात झालेल्या छत्रपती क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळपास दोनशे विजेत्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच आदल्या वर्षीही रेशीमबागमधील महर्षि व्यास सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते. यावेळी विमानतळावरून रेशीमबागपर्यंत मोठी रॅली काढण्यात आली होती. 

हेही वाचा - अरे देवा! वडीलांसाठी जेवणाचा डबा घेऊन गेला अन् डॉक्टरांनी दिले डेथ सर्टीफिकेट

हिंगणघाट येथे गतवर्षी झालेल्या अखिल भारतीय कार्यकारिणी बैठकीच्या निमित्तानेसुद्धा त्यांचा काही काळ नागपुरात मुक्काम होता. त्यांची ही शेवटची नागपूर भेट ठरली. अ. भा. कार्यकारिणी सदस्य संजय लोखंडे यांनी क्रीडाभारतीतर्फे चौहान यांना श्रद्धांजली अर्पण केली.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chetan chauhan visited nagpur many times read full story