
या गाडीतून नागपूर विभागात येणाऱ्या छिंदवाडा, सौंसर, सावनेर, इतवारी, भंडारा रोड, गोंदिया व राजनांदगाव येथील शेतकऱ्यांचा माल कोलकाताला पाठविण्यात आला.
नागपूर ः शेतमालाची कमीत कमी भाडेदरात वाहतूक करून शेतकऱ्यांचे हित जपण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेकडून किसान रेल्वे चालविण्यात येत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाकडून छिंदवाडा ते हावडादरम्यान किसान रेल्वे चालविली जात आहे. बुधवारी (ता. ३) छिंदवाड्याहून हावडासाठी दुसरी फेरी पाठविण्यात आली. या गाडीतून १७४.४६ टन माल पाठविण्यात आला.
२८ ऑक्टोबरला या मार्गावर पहिली किसान रेल्वे चालविण्यात आली होती. पहिल्या फेरीला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता लागलीच दुसऱ्या फेरीचेही नियोजन करण्यात आले. या गाडीतून नागपूर विभागात येणाऱ्या छिंदवाडा, सौंसर, सावनेर, इतवारी, भंडारा रोड, गोंदिया व राजनांदगाव येथील शेतकऱ्यांचा माल कोलकाताला पाठविण्यात आला.
फळ, भाज्यांसह अन्य साहित्य रवाना करण्यात आले. छिंदवाडा येथून पत्ताकोबी, सौंसरहून संत्री, इतवारीहू डाळिंब, संत्री, मोसंबी, आले, फणस, भंडारा रोडहून मिरची, गोंदियाहून अद्रक, हळद, लसूण आणि राजनांदगाव येथून पेरू, दुधी भोपळा पाठविण्यात आला.
क्लिक करा - मोठी बातमी: रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला दारू तस्करीचा कट; जप्त केल्या तब्बल १४० बाटल्या
भाज्या, फळांसारखी नाशिवंत उत्पादने कमी वेळेत सुरक्षितरीत्या अधिक मागणी असणाऱ्या ठिकाणी पोहोचविता येत असल्याने मालाला अधिकचा दरा मिळत आहे. शिवाय कमी वेळेत वाहतूक होत असल्याने मालाचा दर्जा कायम राहतो. दर्जेदार फळ व भाज्या मिळत असल्याने ग्राहकांनाही लाभ होत आहे. शेतकऱ्यांना भाडेदरात ५० टक्के सवलत मिळत असल्याने किफायतशीर दरात वाहतूक व ज्यादा दर असा दुहेरी लाभ शेतकऱ्यांना मिळू लागला आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर उप्पल यांच्या मादर्गदर्शनात आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य निरीक्षक विकास कुमार कश्यप यांच्या नेतृत्वात या फेरीचे नियोजन करण्यात आले. ही गाडी गुरुवारी हावडा, कोलकाता व त्या भागातून साहित्य घेऊन गुरुवारी नागपूरच्या दिशेने रवाना झाली.
संपादन : अतुल मांगे