विदर्भातील हिल स्टेशन "लॉक'च, हॉटेल असोसिएशननेही घेतला मोठा निर्णय...

Chikhaldara Rainy Season Tourism 'Locked'
Chikhaldara Rainy Season Tourism 'Locked'

नागपूर, :  विदर्भातील "हिल स्टेशन' म्हणून ओळख निर्माण झालेल्या चिखलदऱ्याकडे पाऊस सुरू झाला की पर्यटकांची पावले आपसूकच वळतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निसर्गप्रेमी पर्यटकांना खुणावणारे हे पर्यटन क्षेत्र बंद आहे. डोंगर, दऱ्या हिरवाईने नटल्या आहेत, काही ठिकाणी झरेही खळाळू लागले आहेत. तरी पर्यटकांना तेथे येण्यास परवानगी नाही. नागरिकही खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर जाणे टाळत असताना हॉटेल्स असोसिएशनने बंदचा निर्णय घेतला आहे. यामुळे गाइड आणि लहानमोठ्या व्यावसायिकांच्या हक्काचा रोजगार बुडाला आहे. 


मुंबई-पुणे येथील पर्यटक रविवार व शनिवारी लोणावळा वा खंडाळ्याला भेट देतात. त्याचप्रमाणे विदर्भासह शेजारच्या राज्यांमधून या हंगामात अंदाजे दोन ते तीन लाख पर्यटक येथे येऊन जातात. त्यामुळे या भागातील सुमारे दोन हजार कुटुंबाना रोजगार मिळतो. त्यात रिसॉर्टपासून छोट्या हॉटेलपर्यंत, गाइडपासून मदतनिसापर्यंतचा व्यवसाय चालतो. अलीकडे तंबूत आणि जंगलात राहण्याची "क्रेझ' आल्याने सुशिक्षित तरुणांनीही या सेवा उपलब्ध करून देण्याचे व्यवसाय सुरू केले आहेत. यामुळे आजूबाजूच्या आलाडोह, लवादा आणि शहापूर या तीन गावांतील नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळतो. यंदा पर्यटनच बंद असल्याने अंदाजे दहा कोटींचा व्यवसाय बुडाला आहे. 

'रिसोर्ट घेता का रिसोर्ट', का आली ही वेळ... 

यावर्षी व्यवसायापेक्षा आरोग्याला महत्त्व देत चिखलदरा हॉटेल्स ओनर असोसिएशनने मुख्याधिकारी नगर परिषद चिखलदार यांना पत्र दिले आहे. त्यात चिखलदरा येथे कोरोना संसर्ग असलेल्या एकही रुग्ण अद्याप आढळलेला नसून पुढेही कोणाला संसर्ग होऊ नये यासाठी 31 जुलैपर्यंत पर्यटन हॉटेल्स बंद ठेवले जाणार असल्याचे म्हटले आहे. यात स्टे होम, न्याहारी योजना आणि जंगल रिसोर्टचाही समावेश आहे. आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांवर सक्तीची कारवाई करण्यात यावी, असेही असोसिएशनचे म्हणणे आहे. 

शहरातून येणारा पर्यटकच आमचा आधार आहेत. परिसरातील छोटे व्यावसायिक आणि ग्रामस्थ यांचे जीवनही आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. दुर्गम भागात कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पावसाळ्यातील पर्यटनातूनच सर्वाधिक रोजगार येथील हजारो स्थानिकांना मिळत असतो. कोरोनामुळे हा व्यवसाय बुडाला आहे.  प्रवीण चावजी, संचालक, रिसोर्ट मेळघाट 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com