esakal | वर-वधू मंडपात उभे झाले, डोक्यावर अक्षता पडणार इतक्यात काही जण धडकले अन् उडाला थरकाप
sakal

बोलून बातमी शोधा

child protection team stop the marriage of minor girl in mouda nagpur

आता घटीका भरल्यानंतर वरवधूच्या डोक्यावर अक्षता पडून शुभमंगल होणार, इतक्यात गडबड उडाली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व पोलिस मंडपात धडकले. सगळ्यांचे डोळे विस्फारले.

वर-वधू मंडपात उभे झाले, डोक्यावर अक्षता पडणार इतक्यात काही जण धडकले अन् उडाला थरकाप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मौदा तालुक्यातील एक छोटेशे गाव वाकेश्‍वर. या गावात मंगळवारी विवाहाची लगबग सुरू होती. विवाहापूर्वी घरातील सगळ्या धार्मिक परंपरा पूर्ण घरातील सर्व सदस्य, नातेवाइक व्यस्त होते. पाहुण्यांच्या सरबराईसाठी स्वयंपाक करण्याचे काम सुरू होते. लाउडस्पीकरवर मंगलाष्टके लावण्यास थोडा विलंब होता. सगळी जय्यत तयारी जवळजवळ होतच आली होती. आता घटीका भरल्यानंतर वरवधूच्या डोक्यावर अक्षता पडून शुभमंगल होणार, इतक्यात गडबड उडाली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी व पोलिस मंडपात धडकले. सगळ्यांचे डोळे विस्फारले. काय झाले, कुणालाच कळत नव्हते. मंडपात शिरताच पोलिसांनी 'फर्मान' सोडले. विवाह थांबवा! 

हेही वाचा - सात महिलांनी नाकारले चक्क सरपंच पद, 'बाळू'साठी धरला हट्ट

झाले असे की, बाल विवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण तसेच मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण होईपर्यंत विवाह करण्यास बंदी आहे. विवाह झाल्यास कायद्याने वर-वधूकडील मंडळी, लग्नात सहभागी होणारे वऱ्हाडी, डेकोरेशन, बँड-बाजा, भटजी व इतर सर्वांवर कार्यवाहीचे प्रावधान आहे. मौदा तालुक्यातील वाकेश्‍वर गावातील १७ वर्षीय मुलीचा बालविवाह पारशिवनी तालुक्यातील २७ वर्षीय व्यक्तीबरोबर ठरला होता. त्यानुसार मंगळवारी (ता.२) ११ वाजता नवरदेवाकडील मंडळी मंडपात येऊन पोहोचली. परंतु, मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती पोलिस ठाण्यात मिळाली. पोलिसांनी याबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण यांना दिली. त्यानुसार ही माहिती जिल्हा व बाल संरक्षण अधिकारी अर्पणा कोल्हे यांच्या आदेशाने बाल संरक्षण पथक स्थापन करुन त्यात बालसंरक्षण अधिकारी साधना हटवार, सामाजिक कार्यकर्ता स्नेहा सोनटक्के, बालसंरक्षण अधिकारी विनोद शेंडे, बालविकास प्रकल्प अधिकारी माधुरी खोब्रागडे यांना लग्नस्थळी धाव घेतली. त्याअगोदर अरोली पोलिस ठाण्यात वधू, वर मंडळाला बोलावून घेतले. वधूच्या आईवडीलांकडून पथकाने बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत हमीपत्र घेतले. अख्ख्या कुटुंबाचे समुपदेशन करण्यात आले.

हेही वाचा - काळजात धस्स करणारी हिंगणघाटची घटना; काय घडले होते अंकितासोबत गतवर्षी ३ फेब्रुवारीला

महिला व बालविवाह आयुक्तांच्या परिपत्रकानुसार तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यांन्वये बालविवाह थांबविण्यात आलेल्या मुलीला पुढील पुनर्वसनासाठी बाल कल्याण समितीकडे हजर करण्यात यावे, असे पत्र पोलिसांना देण्यात आले. ही कार्यवाही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्पणा कोल्हे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्‍ताक पठाण, बाल विकास प्रकल्प अधिकारी साधना हटवार यांनी पार पाडली. 

go to top