तिकडे पीडितेचा संघर्ष सुरू आहे अन् ईकडे या दोन महिला नेत्या आपसात भिडल्या

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 February 2020

हा सरकारचा कोडगेपणा आहे. कोडगेपणा किती असावा, याची मर्यादा राज्य सरकारने ओलांडली आहे. हिंगणघाटच्या घटनेसाठी सरकारने महाराष्ट्राला उत्तर द्यायला हवे. मुलीला 12वीपर्यंतच शिकवून घरी बसवले असते, तर आमच्यावर ही वेळ आली नसती, असे पीडितेच्या पालकांनी म्हटल्याचेही त्या म्हणाल्या. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात आणि भाषणांत महीला सुरक्षा हा विषय अग्रक्रमावर असतो. पण प्रत्यक्षात तसे काहीही केले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे 24 वर्षीय प्राध्यापिकेला सोमवारी (ता. 3) पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. माणूसकीला काळीमा फासणा-या या घटनेतील पीडितेचा जीवन-मृत्यूशी संघर्ष सुरू आहे. दुसरीकडे मात्र, राज्यातील दोन महिला नेत्यांनी एकमेकांवर आरोप करणे सुरू केले आहे.

उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. पण उपचाराची रक्कम संबंधितांना आजपर्यंत मिळाली नसल्याचा दावा करून "सरकारची ऐपत नसेल, तर पीडितेच्या उपचाराचा खर्च भारतीय जनता पक्ष करेल', असे भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

सतत दोन दिवसांपासून उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल, अशा घोषणा केल्या जात आहेत. पण मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आजपर्यंत रुग्णालय प्रशासनाला रक्कम मिळाली नसल्याचे पीडितेच्या नातेवाईकांनी सांगितल्याचे त्या म्हणाल्या. रुग्णालय प्रशासनाने आपल्याला 40 हजार रुपये जमा करण्यास सांगितल्याचे पीडितेच्या नातेवाईकांनी आपल्याजवळ म्हटल्याचे श्रीमती वाघ म्हणाल्या.

 

- आरोपीची आई म्हणाली मी त्या मुलीला भेटायला जाणार; तीही माझ्या सुनेसारखी

हा सरकारचा कोडगेपणा आहे. कोडगेपणा किती असावा, याची मर्यादा राज्य सरकारने ओलांडली आहे. हिंगणघाटच्या घटनेसाठी सरकारने महाराष्ट्राला उत्तर द्यायला हवे. मुलीला 12वीपर्यंतच शिकवून घरी बसवले असते, तर आमच्यावर ही वेळ आली नसती, असे पीडितेच्या पालकांनी म्हटल्याचेही त्या म्हणाल्या. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात आणि भाषणांत महीला सुरक्षा हा विषय अग्रक्रमावर असतो. पण प्रत्यक्षात तसे काहीही केले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.

राज्याच्या गृहमंत्र्याच्या शेजारच्या जिल्हात क्रौऱ्याची परीसीमा गाठणारी ही घटना घडली. त्यामुळे त्यांना आता खुर्चीवर बसण्याचा अधिकार नसल्याचे श्रीमती वाघ म्हणाल्या.

- गुन्हेगारांना सोडणार नाही, आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदा करण्याची गृहमंत्र्यांनी दिली ग्वाही
 

चित्रा वाघ यांनी राजकारण करु नये : रुपाली चाकणकर
हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न सोमवारी एका माथेफिरुने केला. पिडीता येथील ऑरेंज सीटी हॉस्पीटलमध्ये मृत्युशी झुंज देत आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कालच येथे भेट दिली आणि आज ऑरेंज सीटी हॉस्पीटल प्रशासनाच्या खात्यात चार लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रा वाघ यांना या घटनेचे राजकारण करु नये, असा सल्ला राष्ट्रवादी प्रदेश महीला कॉंग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज दिला.

पीडिता आणि तिच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी श्रीमती चाकणकर बुधवारी येथील ऑरेंज सीटी हॉस्पीटलमध्ये आल्या होत्या. तेव्हा त्यांना माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवण्यात येणार आहे आणि ऍड. उज्वल निकम कामकाज पाहणार असल्याची माहितीही त्यांना प्रसारमाध्यमांना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chitra wagh and rupali chakankar criticise each other