दिलासादायक..! उपराजधानी हळूहळू पूर्वपदावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जून 2020

बाजारपेठा उघडताच नागपूरकरही खरेदीसाठी बाहेर पडू लागल्याचे दिसून आले. हात आखडताच घेत पण अनेकांनी आवश्‍यक साहित्याची खरेदी केली. कपडे,

नागपूर : अडीच महिन्यांपासून बंधिस्त असणाऱ्या नागपूरनगरीने लॉकडाउन शिथील होताच पुन्हा गती पकडली आहे. शहरातील जवळपास सर्वच बाजारपेठा फुलू लागल्या असून उपराजधानी हळूहळू पूर्वपदावर परतत आहे. नागपूरकर नव्या जोमाने जीवनाची पुनर्मांडणी करण्यात व्यस्त झाले आहेत. शहराचे हेच स्पिरीट लवकरच "लाईफ झिंगालाला'चा अनुभव देणार, हे निश्‍चित. 

दिवसरात्र धावणाऱ्या उपराजधानीवर कोरोनाच्या संकटामुळे मार्चच्या मध्यापासून बंधने आलीत. तिसऱ्या आठवड्यापासून सारेच "टाळेबंद' झाले. रस्ते, उद्याने, बाजारापेठा सारेच ओसाड झाले. आता उपराजधानी अनलॉक होते आहे. सोमवारपासून बऱ्याच नियमांमध्ये शिथिलता दिली गेली आहे.

नागपुरात बहरले सोनू सूदचे प्रेम; शंकरनगरातील ब्रेड पकोडा व कटिंग चहाचा होता दिवाना 

यामुळे गोकुळपेठ, धरमपेठ, महाल, बर्डी, गांधीबाग, जरीपटका, रामदासपेठ, धंतोली, सक्करदरा, नंदनवन अशा शहराच्या सर्वच महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये पुन्हा रेलचेल सुरू झाली आहे. बाजारपेठा उघडताच नागपूरकरही खरेदीसाठी बाहेर पडू लागल्याचे आज दिसून आले. हात आखडताच घेत पण अनेकांनी आज आवश्‍यक साहित्याची खरेदी केली. कपडे, इलेक्‍ट्रीकच्या दुकानात लक्षणीय गर्दी दिसून आली. 

"दिस जातील दिस येतील' 
लॉकडाउनमध्ये आईस्क्रीमची दुकाने उघडी असली तरी कोरोनाच्या धास्तीने तिकडे कुणी फिरकत नसल्याचे दिसून आले. उन्हाळ्याच्या शेवटीच का होई ना आईस्क्रीमच्या दुकानांनीही गर्दी खेचने सुरू केले आहे. गर्दी असली तरी प्रत्येक नागपूरकर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत स्वत:सोबतच इतरांनाही कोरोनाच्या संसर्गापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे,

सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे नागपूरकरांचे हे स्पिरीट डोळ्यात भरणारे आहे. झणझणीत तर्री-पोहा, सावजीचा आस्वाद घ्यायला आणखी काही काळ वाट बघावी लागणार असली तरी "दिस जातील दिस येतील, भोग सरल, सुख येईल' या आशेने नागपूरकरांनी केलेली सकारात्मक सुरुवात उल्लेखनीय अशीच आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: city slowly returning to its normal mode