आता बिनधास्त करा सफारी! प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्री करणार गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे उद्घाटन

टीम ई सकाळ 
Tuesday, 19 January 2021

नागपूर जवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत आहे. त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे.

नागपूर : नागपूर इथे असलेल्या बहुचर्चित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नामकरण आता  ‘बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान, नागपूर’ असे करण्यात आले आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला असल्याची माहिती वन मंत्री संजय राठोड यांनी दिली. त्यामुळेच या उद्यानाच्या उदघाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपराजधानीत येणार आहेत. 

नागपूर जवळ गोरेवाडा येथे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान साकारण्यात येत आहे. त्या ठिकाणी जनतेला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रकल्प आराखडा बनविण्यात आला आहे. गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांच्या अखत्यारीत असून तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सफारी व सुविधा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे.

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर उभारणी

जवळपास 2 हजार हेक्टर वन क्षेत्रावर हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणी उद्यान साकारण्यात येत असून यामधील महत्त्वाची कामे महाराष्ट्र वनविकास महामंडळ, नागपूर यांचेकडून पूर्ण करण्यात आलेली आहेत.

भारतीय सफारीचे करणार उद्घाटन

गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे वैविध्यपूर्ण असून त्यामधील भारतीय सफारीचे काम पूर्ण झाले आहे. ही सफारी 26 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जनतेसाठी खुली केली जाणार आहे. या भारतीय सफारीमध्ये व्याघ्र सफारी, बिबट सफारी, अस्वल सफारी, तृणभक्षी प्राणी सफारी कार्यान्वित करण्यासाठी प्राण्यांचे स्थलांतरण सुद्धा करण्यात आलेले आहे. भारतीय सफारीचे उद्घाटन झाल्यानंतर 40 आसन क्षमतेची 3 विशेष वाहने व ऑनलाइन तिकीट बुकिंग सुविधा जनतेसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

जाणून घ्या - १८ वर्ष होवूनही झालं नाही बाळ, पती घरी येताच पत्नी मोठ्यानं किंचाळली अन् घडला थरार

  • नागपूर शहराच्या मध्यापासून गोरेवाडा हे ठिकाण फक्त 6 किलोमीटरवर आहे.
  • भविष्यात हे एक महत्वाचे आणि मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्याचा शासनाचा मानस आहे. 
  • हा प्रकल्प नागपूर शहराला लागून असल्याने या प्रकल्पामुळे या भागात निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल.
  • रोजगाराच्या संधीसुद्धा उपलब्ध होणार आहेत. 
  • वन्यजीव संवर्धन, संशोधन व शिक्षण तसेच वन्यजिवांचे पुनर्वसन, यांबाबतचे कामही या आंतरराष्ट्रीय उद्यानात केले जाणार आहे.
  • प्राणी उद्यानात ये-जा करणाऱ्या पर्यटकांकरिता पार्किंग, प्रसाधनगृह, पिण्याचे पाणी, वाहने इत्यादी सुविधा आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM to Inaugurate Gorewada International Zoo in Nagpur on Independence Day