मला घडवायचेय आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धे; प्रशिक्षक कृष्णा सोनी राहिलेली इच्छा करणार पूर्ण

नरेंद्र चोरे
Saturday, 14 November 2020

२७ वर्षीय कृष्णा सध्या लॉकडाऊनमुळे दहिसर (मुंबई) येथील अकादमीत युवा खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे. त्याच्या अकादमीत मुंबई महानगरपालिकेतील अनेक गोरगरीब विद्यार्थी मुष्टियुद्धाचे धडे गिरवीत आहेत. त्यातील एकाची खेलो इंडिया शिबिरासाठी निवडही झाली.

नागपूर : अनेक खेळाडूंचे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न असते. मात्र, काही कारणास्तव ते साध्य होत नाही. मुंबईकर कृष्णा सोनीच्याही बाबतीत नेमके हेच घडले. कृष्णानेही कधीकाळी ते स्वप्न पाहिले होते. दुर्दैवाने तो राष्ट्रीय स्तरापर्यंतच मजल मारू शकला. मात्र, आता प्रशिक्षक बनून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करून राहिलेली इच्छा पूर्ण करण्याचा मानस त्याने बोलून दाखविला आहे.

मुष्टियुद्ध प्रशिक्षक असलेला कृष्णा मूळचा मुंबईचा. शालेय व महाविद्यालयीन जीवनात उत्तम मुष्टियोद्धा व टॅलेंट असूनही तो राष्ट्रीय स्पर्धेपर्यंतच झेप घेऊ शकला. त्यामुळे शिक्षणात करिअर करण्यासाठी तो पाच वर्षांपूर्वी राजधानी सोडून गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल नक्षलग्रस्त जिल्ह्यात आला. गोंडवाना विद्यापीठात बी.पीएड. करीत असताना सिनिअर खेळाडू व संघटनेच्या पदाधिकऱ्यांनी त्याला एनआयएस कोर्स करण्याचा सल्ला दिला. सुदैवाने या कोर्ससाठी त्याची निवडही झाली.

सविस्तर वाचा - कमी दाबाच्या पट्ट्यामुळे विदर्भात ढगाळ वातावरण; थंडी पळविली आणि पावसाची शक्यता

कृष्णाने नुकताच भारतीय क्रीडा प्राधिकरणच्या (साई) कोलकाता सेंटरमधून एक वर्षाचा एनआयएस प्रशिक्षकाचा डिप्लोमा चांगल्या गुणांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. हा प्रतिष्ठेचा प्रशिक्षण कोर्स पूर्ण करणारा तो गडचिरोली जिल्ह्यातील पहिला मुष्टियुद्ध प्रशिक्षक ठरला आहे. त्यामुळे आता कृष्णाला कुठेही प्रशिक्षक म्हणून जॉब मिळण्याची गॅरंटी मिळाली आहे. त्याचा तसा प्रयत्नही सुरू आहे.

२७ वर्षीय कृष्णा सध्या लॉकडाऊनमुळे दहिसर (मुंबई) येथील अकादमीत युवा खेळाडूंना प्रशिक्षण देत आहे. त्याच्या अकादमीत मुंबई महानगरपालिकेतील अनेक गोरगरीब विद्यार्थी मुष्टियुद्धाचे धडे गिरवीत आहेत. त्यातील एकाची खेलो इंडिया शिबिरासाठी निवडही झाली. या खेळाडूंवर भविष्यात कठोर मेहनत घेऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करण्याचा निर्धार त्याने बोलून दाखविला.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

काही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न

माझे देशाकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. परंतु, यातील काही खेळाडूंना नक्कीच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे नागपूरचे एनआयएस प्रशिक्षक अरुण बुटे व डॉ. राकेश तिवारी यांच्या मार्गदर्शनात सराव करणारा कृष्णा म्हणाला.

बिग बींसोबत केले काम

कृष्णा सोनीला २०१५ मध्ये महानायक अमिताभ बच्चनसोबतही काम करण्याची संधी मिळाली. खेळ आणि शिक्षणाच्या प्रचारासाठी बनविण्यात आलेल्या या ‘ॲड फिल्म’मध्ये कृष्णाने बॉक्सरची भूमिका केली होती. बिग बींसोबतचा तो अनुभव अविस्मरणीय राहिल्याचे त्याने सांगितले. याशिवाय कृष्णाने ‘सारे तुझ्यासाठी’ या मराठी टीव्ही मालिकेतील नायिका गौतमी देशपांडेलाही मुष्टियुद्धाचे धडे दिले.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coach Krishna Soni to form international boxers