आता शंभर सेकंदात कापता येणार अपघातग्रस्त रेल्वे डबा

योगेश बरवड
Friday, 2 October 2020

राजधानी, शताब्दी, दुरांतो, तेजस, वंदे भारत एक्स्प्रेससारख्या वेगवान व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलने तयार केलेले असतात. एलएचबी कोच नावेने ओळखल्या जाणाऱ्या या डब्यांमुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण फारच कमी झाले आहे.

नागपूर : रेल्वे अपघाताप्रसंगी तातडीने मदतीसाठी पोहोचविण्याची जबाबदारी असणाऱ्या ॲक्सीडेंट रिलीफ पथकाने कोल्ड कटिंग उपकरण साकारले आहे. केवळ अडीच हजार रुपयात तयार झालेल्य या उपकरणाच्या मदतीने रेल्वे डब्यांना असणाऱ्या अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यांना केवळ शंभर सेकंदात छिद्र करणे शक्य आहे. एकदा छिद्र होताच कठीण पत्रे सहजतेने कापून कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांना कमी वेळात सुरक्षित बाहेर काढून वैद्यकीय उपचार करून देता येते.

राजधानी, शताब्दी, दुरांतो, तेजस, वंदे भारत एक्स्प्रेससारख्या वेगवान व लांब पल्ल्याच्या गाड्यांचे डबे अत्यंत कठीण अशा स्टेनलेस स्टीलने तयार केलेले असतात. एलएचबी कोच नावेने ओळखल्या जाणाऱ्या या डब्यांमुळे रेल्वे अपघातांचे प्रमाण फारच कमी झाले आहे. अपघात झालाच तरी जीवितहानीची शक्यता फार कमी असते. पण, कोणत्याही कारणाने डब्यांची दारे बंद झाल्यास प्रवासी बाहेर पडू शकत नाही. काही प्रसंगांमध्ये प्रावासी जखमी होऊन आत अडकून पडतात. 

रेल्वेच्या व्यवस्थेप्रामाणे अपघाताची माहिती मिळचाच सर्वप्रथम अजनी रेल्वेस्थानकावर उभी असणारी ॲक्सीडंट रिलीफ ट्रेन रवाना होते. अनेक उपकरणांनी सुसज्ज या ट्रेनमधील कर्मचारीही विशेष प्रशिक्षित असताता. गोल्डन अवरमध्येच अधिकाधिक प्रवाशांनी बाहेर काढून त्यांना जीवदान देण्याची जबाबदारी या पथकावर असते.

अधिक वाचा - सोने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय, भावात मोठी घसरण
 

याच पथकातील वरिष्ठ अनुभाग अभियंता अजिंक्य राजपूत, तंत्रज्ञ मुकेश मंडल, विजय रघुनाथ आणि विनोद नेवले यांनी परिश्रमांती वरिष्ठ विभागीय अभियंता अखिलेश चौबे यांच्या मार्गदर्शनात हे उपकरण तयार केले. एलएचबी कोचचे पत्रे कापणे अत्यंत जोखमीचे काम आहे. सामान्य उपकरण या कठीण पत्र्यावर काम करीत नाही. रेल्वेकडे लाखो रुपयांची उपकरणे आहेत. मात्र, उपलब्ध असलेली उपकरणे वेळ खाणारी आहेत.

 त्यावर उपाय म्हणून कोल्ड कटिंग यंत्र साकारले गेले आहे. त्याचे पाते स्टेनलेस स्टीलचे आहे. त्याच्ये मदतीने एलएचबी कोचला त्रिकोणी छिद्र केले जाते. त्यामुळे पत्रा सहजतेने कापता येतो. या उपकरणाला क्रेडल असल्याने पाती तुटत नाहीत, उडत नाहीत आणि पत्रे सहज कापता येतात. कोल्ड कटिंग उपकरणाची अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली असून, त्याची उपयोगीता लक्षात घेत भारतीय रेल्वेतील सर्व एआरटी पथकांना माहिती पाठविण्यात आली आहे. 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold cutting machine can cut a crashed train in hundred seconds