esakal | थंडीचा कडाका वाढला, पारा घसरला, दिवाळीत हुडहुडी
sakal

बोलून बातमी शोधा

the cold snap began in Vidarbha

हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश पहाडी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. तेथील गारठायुक्त वारे विदर्भाच्या दिशेने येत असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे.

थंडीचा कडाका वाढला, पारा घसरला, दिवाळीत हुडहुडी

sakal_logo
By
नरेंद्र चोरे

नागपूर  : विदर्भात अपेक्षेप्रमाणे थंडीचा कडाका वाढू लागला आहे. बुधवारी नागपूरच्या तापमानात मोठी घट होऊन पारा १२.८ अंशांवर आला. या आठवड्यात गारठा आणखी वाढण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविली आहे.

हिमाचल प्रदेशसह उत्तर भारतातील बहुतांश पहाडी भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बर्फवृष्टी होत आहे. तेथील गारठायुक्त वारे विदर्भाच्या दिशेने येत असल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. कोरड्या वाऱ्यांमुळे गेल्या चोवीस तासांत तापमानामध्ये दोन ते चार अंशांची घट झाली आहे. 

त्यामुळे मंगळवारी १६.२ अंशांवरील नागपूरचा पारा साडेतीन अंशांनी घसरून १२.८ अंशांवर आला. नागपूरचे या मोसमातील हे सर्वात कमी होते. विदर्भातील सर्वच शहरांतील तापमानात मोठी घट झाल्याचे दिसून आले. विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद यवतमाळ येथे १२.० अंश सेल्सिअस इतकी नोंदविण्यात आली. त्याखालोखाल चंद्रपूर येथे १२.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली. कमाल तापमानातही लक्षणीय घसरण झाली.

हेही वाचा - Success Story: तरुणीने फुलवला मशरूमचा मळा; कृषी शाखेच्या विद्यार्थिनीचा नाविन्यपूर्ण उपक्रम 
 

सायंकाळ झाली की हवेत गारवा वाढायला सुरुवात होते. पहाटेच्या सुमारास थंडीची तीव्रता अधिक जाणवते. थंडी वाढत चालल्याने हळूहळू स्वेटर्स, मफलर्स व कानटोपरे बाहेर पडू लागले आहेत. स्वेटर विक्रेत्यांच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. थंडीमुळे सर्दी व खोकल्याचे आजारही वाढले आहेत. 

हवामान विभागाने या आठवड्यात पारा आणखी घसरण्याचे संकेत दिल्याने वैदर्भींची दिवाळी कडाक्याच्या थंडीत जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने यंदाही विदर्भात कडाक्याच्या थंडीची शक्यता वर्तविली आहे. नागपुरात दोन वर्षांपूर्वी २९ डिसेंबर रोजी पारा विक्रमी ३.५ अंशांपर्यंत घसरला होता. 

संपादन  : अतुल मांगे