अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नैमित्तिक सुट्ट्यांवर गदा; कोरोनामुळे मंजूर न करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नीलेश डोये
Saturday, 20 February 2021

गेल्या महिन्यात भारताने कोरोनावर प्रतिबंधात्मक लस निर्माण केली. देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाचा पहिला मानही कोरोना काळात फ्रंट फूटवर लढा देणारे अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आला.

नागपूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजेवर गदा येणार आहे. प्रकोप पाहता प्रशासकीय यंत्रणा कमकुवत राहू नये, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, याची खबरदारी म्हणून आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना जास्त दिवसांच्या नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून विभागप्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हेही वाचा - सावधान! आठ दिवसांत ४ हजार रुग्णांची वाढ, नव्याने साडेसातशे बाधित; मृत्यूही वाढले

गेल्या महिन्यात भारताने कोरोनावर प्रतिबंधात्मक लस निर्माण केली. देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाचा पहिला मानही कोरोना काळात फ्रंट फूटवर लढा देणारे अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आला. लस आल्याने जवळपास सर्वच जण निश्चिंत झाले. परंतु, जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले. त्यामुळे ज्याप्रकारे गेल्यावर्षी जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये कोरोनाचा प्रकोप प्रमाणात वाढला होता त्यावेळी अनेकांना शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये उपचारार्थ खाटादेखील मिळणे कठीण झाले होते. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संपूर्ण तयारी करण्यात येत आहे. पुन्हा निर्बंध कठोर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही प्रादुर्भाव पसरत आहे. अशावेळी परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. त्यामुळे वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सध्या अधिक दिवसांच्या नैमित्तिक रजा मंजूर करू नका, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: collector order to not approve leave of employees in health department due to corona nagpur news