
मोदी सरकारवरची नाराजी लक्षात घेता आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस मुसंडी मारेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे काँग्रेसने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत केली जात आहे.
नागपूर : राज्यात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी होत असला तरी आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसला आघाडी नको आहे. नागपूरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नसताना त्यांना मोठा वाटा देणे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मान्य नाही. यास कडाडून विरोध दर्शविण्यात येणार असल्याचे समजते.
विदर्भात काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत होते. नागपूर महापालिकेत राष्ट्रवादी एक तर शिवसेनेचे फक्त दोन नगरसेवक आहेत. महाआघाडी झाल्यास दोन्ही पक्षाला किमान पन्नास ते साठ जागा सोडाव्या लागतील. सोबतच दोन्ही पक्षाचे महत्त्व वाढेल. याशिवाय दोघांची सदस्यसंख्या वाढल्यास भविष्यात सेना आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अधिक वाचा - आज कलेक्टर डिक्लेअर सुट्टी; कॅलेंडरच्या तारखेतून घडला मेळघाटातील पहिला जिल्हाधिकारी
शहरात काँग्रेसचे अस्तित्व अद्यापही शाबूत आहे. दोन आमदार आहेत. मध्य आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ थोडक्यात गमवावा लागला. घराआड काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. संघटन आहे. पाळेमुळे रुजलेले आहे. त्यात सेना आणि राष्ट्रवादीला प्रवेश दिल्यास भविष्यात मोठी किंमत पक्षाला चुकवावी लागले अशी भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय भाजपच्या नाराजीचा थेट फायदा काँग्रेसला होता.
मतदार पर्याय म्हणून शिवसेना वा राष्ट्रवादीला मतदान करीत नाही. विधानसभा, जिल्हा परिषद तसेच अलीकडेच झालेल्या नागपूर विभागीय पदवीधर निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. मोदी सरकारवरची नाराजी लक्षात घेता आगामी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस मुसंडी मारेल अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे काँग्रेसने महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी अशी मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत केली जात आहे.
आघाडीचा फायदा कुणाला?
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतःच्या फायद्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी करण्यास आग्रही आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मतविभाजनाचा फायदा भाजपला होऊ शकतो. त्यापेक्षा स्वबळावर लढावे, नंतर एकत्रित यावे हा फॉर्म्युला उत्तम आणि सर्वांच्याच फायद्याचा राहील असे एका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
अधिक वाचा - सतत अपचनाचा त्रास होत असल्यास करू नका दुर्लक्ष; हे असू शकतं 'या' समस्यांचं लक्षण
प्रदेशाध्यक्षांचेही संकेत
मुंबई येथे झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा विषय चर्चेला आला होता. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाआघाडीचा निर्णय स्थानिक पदाधिकाऱ्यांवर सोपवावा असे सांगून महाआघाडी होणार नाही असे संकेत दिले.