
नागपूर : नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्याने चैतन्य आलेल्या काँग्रेसने शहरात घरवापसी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका निवडणुकीत आधी गटबाजीने कंटाळून पक्षाच्या बाहेर पडलेले, दुखावलेले तसेच घरी बसलेल्यांना परत मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे पक्षात उत्साह संचारला आहे. त्यांच्या स्वागतासाठी प्रत्येक गटाने गर्दी केली होती. लोकसभा निवडणूक वगळता तसा त्यांचा शहरातील कार्यकर्त्यांसोबत थेट संपर्क नाही. विशिष्ट गटाचा ठपकाही त्यांच्यावर नाही. त्यामुळे महापालिकेच्या उमेदवारी वाटपात यंदा गटबाजी होणार नाही, अशी आशा प्रत्येकाला वाटू लागली आहे.
मागील निवडणुकीत मुत्तेमवार आणि चतुर्वेदी गट एकमेकांसमोर उभे ठाकले होते. एकमेकांची तिकिटे कापण्यातच त्यांनी आधी सर्व शक्ती खर्च घातली. प्रत्यक्ष निवडणुकीतही हेवेदावे कायम राहिल्याने काँग्रेसला मोठा पराभव पत्करावा लागला. फक्त २९ नगरसेवक निवडून आले होते. प्रचारादरम्यान तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाईसुद्धा फेकण्यात आली होती.
आपसातील भांडणाला कंटाळून अनेक कार्यकर्ते शांतपणे घरी बसले आहेत. काहींनी पक्षांतर केले. कोणी अपक्ष निवडणूक लढले होते. मात्र, पक्षासह नुकसान सर्वांचेच झाले आहे. काँग्रेसमधील भांडणाचा भाजपला चांगलाच फायदा झाला. त्यांचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले आहेत. असेच भांडत राहिलो तर आणखी वैयक्तिक नुकसान होईल याची जाणीव आता सर्वांना होऊ लगली आहे.
नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केल्यामुळे नाराजांची आशा पल्लवित होऊ लागली आहे. परिस्थितीसुद्धा बदलली आहे. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आहे. शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आमदार झाले. नितीन राऊत राज्याचे ऊर्जा व शहराचे पालकमंत्री आहेत. सतीश चतुर्वेदी सक्रिय नाहीत. त्यांचे पुत्र शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख आहेत. विलास मुत्तेमवार तब्येतीमुळे घरीच आहेत.
सर्वांना भाजपला पराभूत करायचे आहे. त्यामुळे पक्षबांधणी करताना नाराज झालेले, बाहेर पडलेले आणि शांत घरून बसलेल्यांना पुन्हा सक्रिय करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. नाना पटोले यांच्याच माध्यमातूनही या मोहिमेस प्रारंभ होणार असल्याचे समजते. नाना पटोले यांनीसुद्धा नागपूरच्या पहिल्या भेटीत याचे संकेत दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.