संविधान दिन विशेष : जि.प. शाळेत लोकसहभागातून उभारला संविधान स्तंभ

रूपेश खंडारे
Thursday, 26 November 2020

गावच्या ग्रामपंचायतपासून तर दिल्लीतील संसदेपर्यंतचा कारभार ज्या संविधानातील मार्गदर्शक तत्त्वानुसार चालतो तसेच ज्या संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला

पारशिवनी (जि. नागपूर)  : प्रत्येक गोष्ट शासनानेच केली पाहिजे, अशीच मानसिकता आज सर्वत्र दिसून येत आहे. परंतु, या मानसिकतेला छेद दिला पारशिवनी तालुक्यातील जेमतेम साडेचारशे लोकसंख्या असलेल्या गरंडा गावातील जिल्हा परिषदेच्या छोट्याशा प्राथमिक शाळेने. ज्या संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला, ते संविधान राजकारण्यांच्याच चर्चेचा विषय ठरले.

सामान्य माणूस संविधानापासून दूरच राहिला. आता कुठे संविधान प्रास्ताविकेच्या वाचनातून शालेय स्तरावर ओळख होऊ लागली. अशा परिस्थितीत गरंडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने भारतीय संविधान स्तंभ उभारण्याची संकल्पना मांडली आणि लोकांनी त्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शासनाचा कोणताही निधी नसताना लोकसहभागातून भव्य असा संविधान स्तंभ शालेय परिसरात उभारण्यात आला.  

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गरंडा येथील उपक्रमशील शिक्षकाचे नाव आहे खुशाल मधुकरराव कापसे. गावच्या ग्रामपंचायतपासून तर दिल्लीतील संसदेपर्यंतचा कारभार ज्या संविधानातील मार्गदर्शक तत्त्वानुसार चालतो तसेच ज्या संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या शाश्वत मानवी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या भारतीय संविधानाची ओळख विद्यार्थी जीवनापासून व्हावी, या उद्देशाने गेल्या बारा वर्षांपासून खुशाल कापसे 'जागर संविधानाचा' हा उपक्रम राबवीत आहेत.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का
 

या माध्यमातून संविधान प्रास्ताविका सुंदर हस्ताक्षर स्पर्धा, पाठांतर स्पर्धा, घोषवाक्य लेखन स्पर्धा, भारतीय संविधानावर आधारित सामान्यज्ञान स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,  निबंध स्पर्धा इत्यादी उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत आहे. या उपक्रमांतर्गत लोकशाहीचे प्रेरणास्थळ असावे, या उद्देशाने गरंडा जिल्हा परिषदेच्या शाळेतील परिसरात संविधान स्तंभ उभारण्याची कल्पना मांडली. यासाठी कोणताही शासकीय निधी उपलब्ध नसल्याने हे कार्य लोकसहभागतून करण्याचे ठरले.

यासाठी लालबहादूर शास्त्री विद्यालय बाबुळवाडा येथील प्राचार्या राजश्री उखरे, गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे, केंद्रप्रमुख महेंद्र पारसे,  मुख्याध्यापिका नलिनी ठाकरे, सुजाता मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते रणजित गजभिये, रमेश नागरकर उदाराम सोनकुसरे, अनिल उमक, सुखदेव गेडाम, मनोज शेळकी,  वेध प्रतिष्ठान नागपूर, जीवोदय फाउंडेशन पारशिवनी, खुशाल कापसे यांनी वस्तुरूप व आर्थिक योगदान दिले.

गेंदराज आपूरकर, आशिष मेश्राम, राष्ट्रपाल बोंबले, संदीप मेश्राम, ह्रषिकेश धोटे, आनंद चव्हाण, आकाश शेंडे, अमित आपुरकर,  प्रवीण गजभिये, मयूर आपुरकर, प्रशांत भोयर, शुद्धोधन मेश्राम, अमोल भोयर, प्रशांत गजभिये, अजय गजभिये, प्रज्ज्वल टाले, गौरव आपुरकर, राजकुमार गजभिये यांनी श्रमदानातून सात फूट रुंद आणि १५ फूट उंच असा भव्य संविधान स्तंभ निर्माण केला. ३ फूट बाय ५ फूट आकाराच्या काळ्या रंगाच्या ग्रॅनाईटवर सोनेरी रंगात प्रास्ताविका कोरली आहे.

स्तंभाच्या वरच्या भागात दीड बाय दोन आकाराच्या ग्रॅनाईटमध्ये  कोरलेली भारतीय राजमुद्रा बसविली आहे. खालच्या बाजूस  "संविधान कितीही चांगले असले तरीही राबविणारी माणसे चांगली नसतील तर ते संविधान वाईट ठरते. संविधान कितीही वाईट असले तरी राबविणारे माणसे चांगली असतील तर ते संविधान चांगले ठरते" हा संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला इशारा ग्रॅनाईटवर कोरूलेला आहे. अशाप्रकारे शासनाचा कोणताही निधी नसताना जवळपास एक लाख रुपये बांधकाम मूल्य असलेला हा संविधान स्तंभ गरंडासारख्या छोट्या गावात उभारणे ही बाब सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.

 
लोकशाहीचे प्रेरणास्थळ
भारतीय संविधान हे  धर्म, जात, पंथ, पक्ष या पल्याड जाऊन मानवतेचा विचार करते. तसेच हे संविधान भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. लोकशाहीचे प्रेरणा स्थळ म्हणून  हा भारतीय संविधान स्तंभ उभारण्यात आला आहे. 
खुशाल मधुकरराव कापसे, संयोजक, संविधान स्तंभ निर्मिती.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: constitution pillar erected through public participation in zilla parishad schools